एकेकाळी टीव्हीवर जेव्हा फक्त दूरदर्शनचेच प्रोग्रॅम बघायला लागायचे, तेव्हाही बघण्यासाठी खूप चांगले ऑप्शन्स असायचे. काही मालिका तर अजून आठवतात. ९०च्या दशकात चालू झालेल्या शांती आणि स्वाभिमाननं तर वेगळाच ट्रेंड सेट केला. शांती आणि स्वाभिमानच्या आधीच्या मालिका म्हणजे सहसा मध्यमवर्गी कुटुंबं, नीतीमूल्यं असले आपले नेहमीचे प्रकार असायचे. या दोन मालिकांनी श्रीमंती कुटुंबं, त्यांची राजकारणं आणि इतर लफडी असा सगळा मालमसाला आणला. असं असलं तरी त्या मालिका बघणेबल होत्या. आताच्या मालिकांत कुणाचं कितवं लग्न, कुणाचं पोर कुठलं आणि कुणाची किती हजार करोडोंची जायदाद कुणी हडप केली हे आठवायचं म्हटलं तरी भल्याभल्यांना फेफरं येतं.
ते जाऊ दे.. रोज संध्याकाळी चार वाजता टीव्हीवर येणारी ’स्वाभिमान’ तुमच्यापैकी किती जणांना आठवतेय? स्वेतलाना, तिचा कधीच न दाखवलेला आणि मनिलामध्ये मेलेला नवरा.. तोपर्यंत भारतातल्या कितीतरी लोकांना मनिला नावाचं शहर आहे हे ही माहित नव्हतं. त्याचा भाऊ , त्याचं भलं मोठं कुटुंब आणि इतर भानगडी.. बापरे बाप.
१९९५ मध्ये आलेली स्वाभिमान ही भलीमोठी स्टारकास्ट असलेली मालिका होती. या मालिकांपर्यंत दूरदर्शनच्या मालिका १३ नाहीतर २६ एपिसोड्सच्या असायच्या. ५०० एपिसोडची आणि तब्बल दोन वर्षं चाललेली ही भारतातली पहिलीच मालिका. त्यात बर्याच नव्या चेहर्यांना छोट्या पडद्यावर झळकण्याची पहिली संधी मिळाली आणि त्यांनी त्या संधीचं अक्षरश: सोनं केलं..










