आंतरराष्ट्रीय शांतता दिवसाच्या सौजन्याने सर्वत्र जागतिक शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने अनेक उपक्रम राबवले जातात. याच उपक्रमांचा एक भाग म्हणजे युनेस्को मार्फत दरवर्षी शांततेचा संदेश देणाऱ्या फोटोंना ग्लोबल पीस फोटो अवॉर्ड बहाल केले जाते. ऑस्ट्रेलिया आणि युनेस्को यांच्या संयुक्त विद्यमाने हा दरवर्षी हा पुरस्कार घोषित केला जातो. जागतिक शांतता हाच या पुरस्कार देण्यामागचा उद्देश असला तरी यावर्षीच्या पुरस्काराचे खास वैशिष्ट्य म्हणजे यंदा हा पुरस्कार पटकावणाऱ्यांच्या यादीत एका सात वर्षांच्या भारतीय मुलीचे नाव आहे. शांततेसाठी ओळखल्या जाणाऱ्या गांधींच्या देशात त्यांच्याच १५२ व्या जयंतीदिनी हा पुरस्कार घोषित होणे म्हणजे आणखीनच अभिमानाची बाब! महत्वाचे म्हणजे हा पुरस्कार मिळवणारी ती पहिली भारतीय आहे. भारताच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवणाऱ्या या मुलीचे नाव आहे, आद्या अरविंद शंकर!
अवघ्या सात वर्षाच्या आद्याला फोटोग्राफीचे अतिशय वेड आहे. तिची आई रोशनीचा मोबाईल म्हणजेच तिचा कॅमेरा. तिचे वडील अरविंद आपल्या लेकीच्या या भन्नाट कलेला जपण्याचा आणि तिला प्रोत्साहन देण्याचा अतोनात प्रयत्न करतात. ज्या-ज्या ठिकाणी फोटोग्राफी स्पर्धा असेल त्यात्या ठिकाणी तिचे फोटो ते आवर्जून पाठवतात.
यावर्षीच्या ग्लोबल पीस अवॉर्ड आणि त्याची थीम याविषयी जेव्हा त्यांच्यात चर्चा झाली तेव्हा तिने काही दिवसांपूर्वी आपल्या आईचा काढलेला एक फोटो या स्पर्धेसाठी पाठवायचा ठरवले. काय खास आहे या फोटोत?

