नवीन सिनेमांत आलेली नऊ जुनी गाणी.. या गाण्यानं तर अतुल कुलकर्णी, के के मेनन आणि नसीरूद्दिन यांनाही नाचवलंय...

नवीन सिनेमांत आलेली नऊ जुनी गाणी.. या गाण्यानं  तर अतुल कुलकर्णी, के के मेनन आणि नसीरूद्दिन यांनाही नाचवलंय...

नवीन गाणी कितीही आली तरी जुन्या गाण्यांची मजा काही औरच असते.

आपल्या सिनेमांतही बरीच जुनी गाणी नव्या ढंगात आली आहेत.  काही गाणी आहे तशी, तर  काहींचा रिमिक्स झालंय तर काही फक्त मुखडा तोच, पण नव्या कडव्यांसोबत आली आहेत. आज आम्ही घेऊन आलो आहोत अशी ८ गाणी.. यांतलं तुमचं आवडतं गाणं कोणतं??

 

१. तम्मा तम्मा लोगे- ठाणेदार (१९९०) आणि बद्रीनाथ की दुल्हनियॉं

नवीन सिनेमांतल्या नव्या गाण्यांचा विषय निघाल्यावर आत्ताचं ताजंतवानं बद्री की दुल्हनियॉंमधलं  ’तम्मा तम्मा’च आठवणार नाही का? १९९०मध्ये आलेल्या ठाणेदार सिनेमातलं गाणं तेव्हाही खूप गाजलं होतं. आता बघितलं तर संजय दत्त आणि माधुरी दोघांच्याही नाचाच्या काही स्टेप्स शाळेतल्या सामुदायिक कवायतीची आठवण करून देतात. नव्या गाण्यात आलिया आणि वरून मस्त नाचलेयत. आपली तर दोन्हीही गाणी फेवरीट बाबा!!

 

२. हम्मा हम्मा – बॉंबे(१९९५) आणि ओके जानू

१९९५साली आलेला बॉंबे बर्‍याच कारणांनी गाजला. काही थेटरांत जाळपोळ झाली, बरंच काही झालं. लोकांनी सिनेमाला आणि सिनेमातल्या सगळ्या गाण्यांना डोक्यावर घेतलं. प्रत्येक गाण्याची जातकुळी वेगळी होती. असो. हे हम्मा हम्मा गाणं पण लोकांना बेहद्द आवडलं होतं. तोंडावर घुंघट घेऊन नाचणारी सोनाली बेंद्रे आहे हे कळायलाही लोकांना बराच वेळ लागला होता. रेमोचा आवाज आणि प्रभू देवाचा भाऊ नागेंद्र प्रसादचा डान्स, ए. आर रहमानचं संगीत आणि बॅकग्राऊंडला स्वप्नील डोळ्यांचा अरविंद स्वामी-मनीषा कोईरालाचा रोमान्स.

ओके जानूमधलं नवं हम्मा हम्मा पण भारी जमलंय. श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर यांचं खट्याळ रोमान्सवालं गाणं एकदम टवटवीत वाटतं.

 

३. तू मेरी जिंदगी है – मोहब्बत मर नहीं सकती (१९७७) आणि आशिकी

आपल्या पिढीनं हे गाणं बघितलं थेट पहिल्या आशिकी सिनेमात. वीरेंद्र सक्सेना त्याच्या दोन सहकार्‍यांसोबत रस्त्यावर हे गाणं म्हणतो. सिनेमात जेव्हा हे गाणं येतं, तेव्हा तिथं रात्र असते. गाणं म्हणून भीक मागण्यापेक्षा ते स्वत:साठी गात असल्यासारखं हे गाणं वाटतं.

 आधी लोकांना वाटलं की हे आशिकीमध्ये दाखवलेलं गाणं नवीनच आहे. पण मग तुम्हांला माहित आहे ना, लोक कशी उचकपाचक करून खरं काय ते बाहेर काढतातच. हे गाणं खरंतर आहे मोहब्बत मर नहीं सकती नावाच्या पाकिस्तानी सिनेमातलं. मूळ गाणं गायलंय नूरजहॉंनं..

 

४. हवा हवा – हसन जहांगीर आल्बम(१९८७) आणि चालीस चौरासी

पाकिस्तानसोबत आपली संगीताची देवाणघेवाण चालूच असते.  पाकिस्तानी कोक स्टुडिओच्या युट्यूब चॅनेलवर जाऊन पाहा, लोक सगळा वैरभाव विसरून “संगीताला देशधर्माच्या सीमांचं बंधन नसतं” या अर्थाच्या कमेंट्स लिहित असतात.

१९८७मध्येही हसन जहांगीर नावाच्या पाकिस्तानी गायकाच्या एका आल्बमनं सगळीकडं अक्षरश: धुमाकूळ घातला होता. हवा हवा, फॅशन के ये रंग नये, आ जाना ये दिल है दिवाना, दिल जो तुझ पे आया है-प्यार का जादू छाया है.. सगळी गाणी पब्लिकला एकदम तोंडपाठ!! तेव्हा हे गाणं मिथुनच्या एका सिनेमात घेतलं पण होतं. नंतर मग कुणी म्हणे वर्षभरातच हसन जहांगीर हार्ट ऍटॅकने मेला, कुणी म्हणे खून झाला.. नुसत्या बातम्याच बातम्या.

चालीस चौरासीसाठी मात्र ’हवा हवा’चा रिमेक करण्यासाठी लोकांनी त्याची भेट घेतली. हसनने नुसते या गाण्याचे  कॉपीराईटच दिले नाहीत तर सिनेमात गाणंसुद्धा गायलं. अर्थात अतुल कुलकर्णी, के के मेनन आणि नसीरला नाचताना पाहणं अवघडच आहे. पण त्यांचाही इलाज नाही. तुम्हीही हे गाणं लावा पाहू.. तुम्हीही नाचाल ही पैज आपली!!

सध्या मुबारकां या नव्या सिनेमात अर्जुन कपूर आणि इलियाना डिक्रूज या गाण्याच्या सुरावटीवर थिरकताना दिसताहेत.

 

५. हवा हवाई – मि. ईंडिया (१९८६) आणि शैतान

१९८६ मध्ये आलेलं श्रीदेवीचं हवाहवाई गाणंसुद्धा भरपूर गाजलेलं गाणं. खट्याळ, कुठलंही रूप बदलू शकणारी श्री पाहाणं म्हणजे धमाल टाईमपास असतो. हे गाणं शैतानमध्ये कल्की कोचलीनवर चित्रित झालंय..

 

६. काला चश्मा – पंजाबी गीत आणि बार बार देखो

काला चष्मा गाणं आलं आणि लोकांची कतरिनावरून नजर हटेनाशी झाली. सिद्धार्थ मल्होत्रा त्या गाण्यात नसता तरी चालला असता, नाही? पण मंडळी, हे मूळ पंजाबी गाणं खूप जुनं आहे. इतकं जुनं की नक्की केव्हाचं आहे हे ही लोकांना माहित नाहीय.

 

७. डिस्को दीवाने (१९८१) आणि स्टुडंट ऑफ द इयर

आता हे गाणं तुम्ही स्टुडंट ऑफ द इयर मध्ये ऐकलं असेल ना? हे मूळ गाणं गायलंय नाझिया हसन नावाच्या  पाकिस्तानी गायिकेनं.  हीनं हे गाणं गायलं होतं १९८१ मध्ये आणि तेव्हा या गाण्यानं चौदा देशांत धुमाकूळ घातला होता. हे गाणं ऐकलंत तर तुम्हांला कुर्बानीतलं “आप जैसा कोई मेरी जिंदगी में आये” गाणं आठवेल. साहजिक आहे, ते गाणंही नाझियानंच गायलंय.

 

८. आज फिर तुमपे प्यार आया है- दयावान(१९८८) आणि  हेट स्टोरी २

या गाण्यानं एकेकाळी काय आग लावली होती. माधुरी आणि विनोद खन्नाचं हे गाणं तेव्हा खूप वादग्रस्त ठरलं होतं. आता इम्रान हाश्मीकाळात आपल्याला असल्या गाण्यांची सवय झालीय. अरिजीत सिंगने गायलेलं हे गाणंही छान जमून आलंय..

 

९. हर किसिको नहीं मिलता – जॉंबाज (१९८६  ) आणि बॉस

श्रीदेवीला तिच्या करिअरमध्ये काही भन्नाट गाणी मिळालीत. पूर्वी तर दिल तुटलेल्या प्रत्येक देवदासाचं ’हर किसीको नहीं मिलता’ हे खास गाणं होतं. हे गाणं ऐकताना डोळ्यांसमोर लाल साडी नेसून ढगांत गाणं म्हणणारी श्रीदेवीच उभी राहाते. कॉंटे नहीं कटते आणि हर किसी को नही मिलता या दोन्ही गाण्यांत ती साध्या प्लेन साड्यांत पण खूप सेन्शुअस दिसलीय.

या गाण्याच्या नवीन रिमेकमध्ये अक्षय काऊबॉय वेशात आणि सोनाक्षी सिन्हा साडीमध्ये असं विचित्र कॉंबिनेशन आहे. पण दोघं दिसताहेत्त छान. या गाण्यात सोनाक्षी गवतावर पडून  श्रीदेवीच्या  कॉंटे नहीं कटतेची नक्कल करतेय असं मात्र वाटतं.  हे गाणं पूर्ण मूळ गाणं नाहीय, मुखडा जुन्या गाण्याचा घेऊन नव्या कडव्यांची भर घातलीय.

लैला मैं लैला, पल पल दिलके पास, धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना, तय्यब अली प्यार का दुश्मन या गाण्यांत पण फक्त मूळ अंतरा घेऊन नवीन कडव्यांची भर घातली गेलीय.

मग कोण‌तं गाणं आहे तुम‌चं फेव्ह‌रिट ??