भारताबाहेर नेल्या गेलेल्या ९ ऐतिहासिक गोष्टी

लिस्टिकल
भारताबाहेर नेल्या गेलेल्या ९ ऐतिहासिक गोष्टी

ब्रिटिश सरकारच्या काळात बेकायदेशीररित्या भारतातील ऐतिहासिक वस्तू इंग्लंडला नेण्यात आल्या. या वस्तूंत कोहिनूर हिरा सर्वांच्या परिचयाचा आहे. हा हिरा भारतात परत यावा म्हणून अनेक प्रयत्न झाले. स्वातंत्र्यानंतर लगेचच १९४७ साली पहिला प्रयत्न करण्यात आला, पण भारताचे सगळेच प्रयत्न ब्रिटिश सरकारने हाणून पाडले. असाच एक प्रयत्न एप्रिल २०१६ मध्ये सुद्धा झाला. पुरातत्व खात्याने आत्तापर्यंत बेकायदेशीररित्या भारताबाहेर नेलेल्या वस्तूंना परत आणण्याचे अनेक प्रयत्न केले आहेत, काही वस्तू मिळवण्यात यश देखील आले. परंतु कोहिनूर हा स्वातंत्र्यपूर्व काळात भारताबाहेर नेला असल्याने तो पुन्हा भारतात आणणे शक्य नसल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. तसेच इंग्रजांनी कोहिनूर लूट करून किंवा फसवून घेतलेला नाही तर तो रितसर नजराणा म्हणून राणीला भेट म्हणून दिला असल्याने कोहिनूर परत आणण्याच्या मार्गात अडचणी वाढत चालल्या आहेत.

कोहिनूरबरोबर आणखीही काही वस्तू बेकायदेशीररित्या भारताबाहेर नेण्यात आल्या. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत अश्याच काही ९ वस्तूंची माहिती.....

 १)	सुलतानगंज बुद्धमूर्ती

१) सुलतानगंज बुद्धमूर्ती

१८६१ स्वातंत्रपूर्व काळात भागलपूर, सुलतानगंज येथे रेल्वेचे काम चालू असताना जवळजवळ ५०० किलो वजनाची बुद्धाची मूर्ती सापडली. तिला ताबडतोब बर्मिंगहॅमला पाठवण्यात आले. इतिहासकारांच्या मते ही मूर्ती इ. स. ५०० ते ७०० सालातील आहे. आपण आजही या मूर्ती बर्मिंगहॅम म्युझियममध्ये पाहू शकतो.

 २)	नासक हिरा

२) नासक हिरा

नासक हिरा हा १५ व्या शतकात सापडलेला ४३.३८ कॅरेटचा हिरा आहे. हा आंध्रप्रदेशातील मेहेबूबनगर जवळील आमरागिरी खाणीत सापडला होता. हा हिरा नाशिकच्या त्र्यंबकेश्वराच्या मुकुटावर १५ व्या शतकापासुन इ.स १८१७ पर्यंत होता. इंग्रज-मराठा युद्धात मराठ्यांचा पराभव केल्यानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने हा हिरा ब्रिटीश सराफांना विकला. १९२७ साली नासक हिरा अमेरिकेला आणण्यात आला आणि त्या नंतर लिलावात अमेरिकेच्या एका नागरिकाला विकण्यात आला. सध्या हा हिरा एडवर्ड या अमेरिकन माणसाच्या संग्रही आहे.  त्याने $५००,००० किमतीत हिरा विकत घेतला होता.

३)	टिपू सुलतानची तलवार आणि ४) अंगठी

३) टिपू सुलतानची तलवार आणि ४) अंगठी

टिपूचा पाडाव झाल्यानंतर इंग्रजांनी केलेल्या लुटीत टिपू सुलतानाची तलवार आणि अंगठी लुटून इंग्लंडला पाठवली. २००४पर्यंत दोन्ही वस्तू ब्रिटिश म्युझियममध्ये प्रदर्शनात होत्या. भारतीय उद्योजक विजय मल्याने २००४ साली £175,000 किंमतीत टिपू सुलतानाच्या ३० वैयक्तिक वस्तू भारतात परत आणल्या. त्यात तलवार आणि अंगठीचा देखील समावेश होता.

५)	महाराजा रणजीतसिंहांचं सुवर्णासन

५) महाराजा रणजीतसिंहांचं सुवर्णासन

१८५० साली शीख-इंग्रज युद्धाच्या अंती शीखांची मालमत्ता इंग्रजांनी हस्तगत केली.  यात कोहिनूरबरोबर महाराजा रणजीत सिंह यांचं सुवर्णासनदेखील होतं.   लाकूड आणि सोन्याच्या पत्र्याचा वापर करून हे सुवर्णासन तयार करण्यात आले आहे.हे सुवर्णासन आजच्या घडीला ‘व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम’ मध्ये पाहण्यास मिळते.

६)	शहाजहानचा  धवल पाचूपासून तयार केलेला चषक

६) शहाजहानचा धवल पाचूपासून तयार केलेला चषक

कलेची आवड असलेल्या शहाजहानसाठी खास पांढर्‍या पाचूचा  (white nephrite jade) पेला तयार करण्यात आला होता. १६५७ च्या सुमारास याची निर्मिती केली गेली असावी असा अंदाज आहे. १८५७ च्या संग्रामानंतर हा पेला सर्व अन्य मौल्यवान वस्तूंबरोबर हस्तगत करण्यात आला. आज हा पेला ’व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम’ मध्ये आहे.

७)	अमरावती शिल्पे

७) अमरावती शिल्पे

अमरावती शिल्पांबद्दल बोलताना एक अभ्यासकाने लिहून ठेवले आहे की “भारतात यापेक्षा सुंदर तुम्ही दुसरे काहीच बघू शकणार नाही”. १८५९ साली उत्खननात सापडल्यानंतर लगेचच ब्रिटिशांनी या शिल्पांना लंडनला हलवले. ब्रिटिश म्युझियम मध्ये आज आपण त्यांना पाहू शकतो.

८)	वाग्देवी मूर्ती

८) वाग्देवी मूर्ती

वाग्देवी मूर्ती माळवा प्रांतातील धार येथील सरस्वती मंदिरातील आहे. या सरस्वती मंदिराची निर्मिती राजा भोज याने इ.. १३०५ मध्ये केली होती.  वाग्देवीची ही मूर्ती सध्या लंडन येथील ब्रिटिश म्युझियममध्ये आहे.

९)	टिपू सुल्तांचा यांत्रिक वाघ

९) टिपू सुल्तांचा यांत्रिक वाघ

टिपू सुलतानचा इंग्रज द्वेष या यांत्रिक वाघाच्या रूपाने दिसून येतो. यंत्रात एक वाघ इंग्रजाच्या छाताडावर बसलेला दिसून येतो. टिपू सुलतानाच्या महालात शिरल्यावर इंग्रजांच्या हाती हे यंत्र लागले होते.