छडी लागे छम छम, विद्या येई घमघम असे एक बडबडगीत आपण लहानपणी म्हणत होतो, तुम्हाला आठवत असेल. या बडबडगीतात मुलांना मारल्यामुळे त्यांना अक्कल येते असे बिंबवण्यात आले आहे. खरे तर घरात आई-वडिलांचा आणि शाळेत गुरुजी किंवा बाईंचा मार म्हणजे प्रसादच. म्हणजे कसं की त्याला नाही म्हणायची किंवा विरोध करायची हिंमतच व्हायची नाही. आज शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षा देण्यावर विशेषत: छडीचा वापर करण्यावर बंदी असली तरी अजूनही पालकांना ती मुभा आहे.
मुलांना शिस्त लावण्यासाठी त्यांना मारावेच लागते, असा आपल्या आजी-आजोबांच्या पिढीचा समज होता. त्यानंतर मुलांना शिस्त लावण्यासाठी कधीकधी एखादा फटका दिला तर चालतो, असा आपल्या आई-वडिलांच्या पिढीचा समज होता. आज मात्र काय शिस्त लावण्यासाठी मारणं? छे, किती तो क्रूरपणा! असे ऐकवले जाते बरोबर ना? पण प्रत्यक्षात खरोखरच पालक इतका सूज्ञपणा दाखवत असतील का हो? तुम्हाला काय वाटते? नसतील! हे उत्तर असेल तर तुम्ही बरोबर आहात.
मुलांना मारू नये असे म्हटले जात असले तरी तसे वागले जात नाही. अनेक पालक मुलांना शिस्त लावण्यासाठी, अभ्यास करवून घेण्यासाठी अशा वेगवेगळ्या कारणांनी मुलांवर हात उचलतात. आता यात हात म्हणजे फक्त हात एवढंच अभिप्रेत नसतं. तर त्यात कधी चप्पल, कधी झादू, कधी रॉड, कधी काठी अशा कित्येक गोष्टींच मदत घेतली जाते. हे झालं पालकांचं!


