हृतिक रोशनने आईसोबतचा फोटो पोस्ट केला पण नेटकऱ्यांचं लक्ष कशावर अडकलंय हे पाह्यलं का??

लिस्टिकल
हृतिक रोशनने आईसोबतचा फोटो पोस्ट केला पण नेटकऱ्यांचं लक्ष कशावर अडकलंय हे पाह्यलं का??

सोशल मिडीयावर फोटो पोस्ट करण्याची हौस कुणाला नसते सांगा? सामान्य माणसापासून मोठमोठ्या सेलिब्रिटीपर्यंत कुणालाही हा मोह सुटलेला नाही. अलीकडेच प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता ज्याला त्याचे चाहते ग्रीक गॉड म्हणून ओळखतात त्या हृतिक रोशनने एका सकाळी आईसोबत काढलेला फोटो आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये हृतिकने म्हटले आहे, “एक आळशी सकाळ आणि आई सोबत केलेली न्याहारी, खरंच ही सकाळ खूपच सुंदर होती!”

फोटोत तो खुर्चीत बसलेला दिसतो आणि त्याची आई गॅलरीतून बाहेर रस्त्याकडे पाहताना दिसते आहे. अगदी साधा सरळ फोटो, पण नेटिझन्स ना यात एक वेगळीच गोष्ट लक्षात आली. आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या घरी असणारी समस्या हृतिकलाही भेडसावू शकते हे पाहून नेटिझन्स असे काही सुखावले आहेत की विचारू नका.

आता या फोटोवर आलेले रिप्लाय पाहण्याआधी या फोटोतील एक गोष्ट तुम्हालाही दिसलीच असेल. हो आम्ही आणि नेटिझन्सही बोलतायत ते हृतिकच्या घराच्या भिंतीवर धरलेल्या पोपड्यांबद्दल! पावसाळ्यात कुठल्याही घरात दिसणारी एक सामान्य समस्या! कदाचित श्रीमंताच्या घराच्या भिंती या महागड्या पेंट्सनी पेंट केलेल्या असतात आणि त्याला पोपडे धरू नये म्हणून त्यांनी अजूनही काही तरी प्रयोग करत असतील असा समज दृढ असल्याने ह्रितिकसारख्या सेलिब्रिटीच्या घराच्या भितींवर धरलेले हे पोपडे पाहून नेटिझन्सना कोण आनंद झाला आहे पाहा! त्यांचा हा आनंद त्यांच्या कमेंटमधून ओसंडत आहे.

एका कमेंटकर्त्याने म्हटले आहे, “तुमच्या घरच्या भिंतीही पोपड्यांनी खराब होतात!!"" आणि पुढे दोन भयावह इमोटीकॉन जोडले आहेत.

तर आणखी एक जण म्हणतो, “श्रीमंताच्या घरीही पोपडी धरण्यासारख्या समस्या असू शकतात हे पाहून बरे वाटले.”

आणखी एकाने तर हृतिकला घराचे पेंट करून घेण्याचा सल्ला (की टोला) दिला आहे.

आणखी एकाने विचारले आहे, “सर, तुमच्या घरातील गळती काढण्यासाठी कुणाला तरी पाठवून देऊ का?”

आता या सगळ्या कमेंट्सचा फायदा जर मोठ्या पेंट कंपन्यांनी घेतला नाही तर कोण घेणार? याच पोस्टवर एशियन पेंटने हृतिकच्याच एका GIFचा वापर करत रिप्लाय दिला आहे. आता तो रिप्लाय काय आहे तो तुम्हीच पहा. अर्थात या सगळ्यांवर हृतिकनेही उत्तर दिलं आहे, ते ही जरुर वाचा.

आणि हो, हृतिकच्या घराच्या भिंतीवरील पोपडे पाहून तुम्हीही सुखावला असाल तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.

मेघश्री श्रेष्ठी