काही दिवसांपासून एका युवकाचे अनेक व्हिडीओ तुम्ही बघितले असतील. हा भाऊ काय करतो? तर ज्या गोष्टी लोक खूप किचकट पद्धतीने करतात त्या कशा अत्यंत सहज साध्या पद्धतीने करता येतात हे एकही शब्द न बोलता आपल्या ३० सेकंदांच्या व्हिडिओतून दाखवत असतो. खाबी लेम हे त्याचे नाव आहे. एव्हाना तुम्ही त्याला ओळखलेच असेल.
खाबी लेमने काल टिकटॉकवर १० कोटी फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला. खाबी ज्या इटलीचा रहिवासी आहे त्या देशाची लोकसंख्याही १० कोटी नाही. इतकेच नाही तर पठ्ठ्याचे इन्स्टाग्राम फॉलोअर्स हे इन्स्टाग्रामचा मालक मार्क झुकरबर्गपेक्षा जास्त आहेत.
लॉकडाऊनमध्ये अनेकांचे कामधंदे बंद पडले. यात काहींचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले, तर काहींनी आपले काम बंद झाले हे एकप्रकारे खूप चांगले झाले हेच सिद्ध करून दाखवले. खाबी हा देखील त्यातलाच एक नमुना.

