आपण नोकियाच्या फोनबद्दल नेहमी एक गोष्ट ऐकत असतो, ती म्हणजे हा फोन कितीही वरून फेकला तरी फुटत नाही. टिकाऊपणाच्या बाबतीत नोकियाच्या फोन्सला तोड नव्हती हे पण तुम्ही ऐकले असेल. तर मग आज मोटोरोलाचा किस्सा ऐका. याच्यासमोर तुम्हाला नोकियाची मजबूती चिल्लर वाटायला लागेल.
गोष्ट तशी ब्राझीलमधली आहे. मागच्या आठवड्यात एका दुकानावर दरोडा पडला. दुकानाचा मालक दरोडेखोरांना बधत नव्हतं म्हणून त्यांनी थेट गोळी चालवली. गोळी सरकन आली आणि पॅन्टचा खिसा असतो तिथे घुसली. पण दुकानदार गृहस्थ मात्र निश्चित उभे होते.
गोळीचा परिणाम न व्हायला दुकानदार काही रजनीकांत नाही. मग नेमके काय झाले? तर गोळी आधी खिशात असणाऱ्या ५ वर्षे जुन्या मोटो G5 या मोबाईलला लागली. त्या मोबाईलवर हल्कचे कव्हर आहे. या मोबाईलला गोळी लागूनही दुकानदाराचे तर शारीरिक नुकसान झाले नाहीच, पण मोबाईलचीदेखील फक्त स्क्रीन फुटली आहे.

