सिनेविश्वात अनेक अभिनेते आणि अभिनेत्री आहेत.त्यांना यशोशिखरावर पोहचण्यासाठी अथक परिश्रम करावे लागले आहेत.हलाखीत दिवस काढावे लागले आहे.काहींना चित्रपटात येण्यासाठी रस्त्यावर झोपावे लागले तर काहींना बँक किंवा सोसायटीबाहेर सुरक्षारक्षक म्हणूनही काम करावे लागले आहे.अभिनय हे पहिले प्रेम असल्याने,अनंत अडचणींवर मात करुन यशोशिखरावर पोहचलेले दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी ते हिंदी चित्रपटसृष्टी असा मोठा प्रवास करुन नावारुपाला येणारे अभिनेते मोहम्मद हनीफ उर्फ नास्सर यांचा आज दि. ५ मार्च जन्मदिवस.
गेल्या काही वर्षांपूर्वी आलेल्या 'बाहुबली' चित्रपटातील बिज्जलदेवच्या खलनायकी भूमिकेने संपूर्ण जगभरात चर्चेत आलेले अभिनेता नास्सर कायमच आपल्या वेगवेगळ्या भूमिकेमुळे चर्चेत राहतात. रोजा, वीरम, खुशी, चाची ४२०, रावडी राठोड, थलायवी आणि अखेरीस बाहुबली या चित्रपटातून विविधांगी भूमिका साकारणाऱ्या नास्सर यांचा बॉलिवूडमध्ये फार मोठा चाहतावर्ग आहे. नास्सर यांनी आपल्या सिनेकारकिर्दित, विविध प्रकारच्या भूमिका साकारत अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनात उमटवली.



