भारत पाकिस्तानमधला तणाव पाहता आपण दोन्ही देश एकमेकांच्या जीवावर उठलो आहोत की काय असं चित्र रंगवलं जातं. पण खरं बघायला गेलं तर भारतीय सामान्य माणसाला आणि पाकिस्तानातील सामान्य माणसाला द्वेष आणि वाद यात काहीही रस नाही मंडळी. दोन्ही देशांतला एक दुवा म्हणजे सिनेमा आणि त्यातही गाणं हा अगदी जिवाभावाचा विषय. गाण्याला कोणतीही सीमा नसते हे पुन्हा एकदा एका गायिकेने दाखवून दिलं आहे.
'नाझिया अमिन मोहम्मद' असं नाव असलेली मुळची ‘युएई’च्या आणि सध्या कराचीत रहणाऱ्या गायिकेनं सर्वांना धक्का देत चक्क मराठीत गाणं म्हटलंय. जोगवा सिनेमातलं ‘जीव रंगला’ हे गाणं अगदी मराठी गायिकेला शोभावं असंच तिनं गायलंय. एका पाकिस्तानी गायिकेनं मराठी गाणं गावं हे अगदीच अनपेक्षित होतं.
शब्दांचं उच्चारण थोडं इकडं-तिकडं झालं असलं तरी तिचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. तिनं हा व्हिडीओ आपल्या फेसबुक पेजवरून शेअर केल्यानंतर तिच्या गाण्याचं कौतुक तर झालंच पण तिचा हा व्हीडोओ तुफान व्हायरल झालाय्. पाकिस्तानातून मराठी प्रेक्षकांना दिलेली ही एक मस्त ट्रिट आहे असंच म्हणावं लागेल.
वर्षभरापूर्वी तिने मल्याळी भाषिकांसाठी एक खास गाणं गायलं होतं, त्यामुळे ती चर्चेत आली होती. यावेळी तिच्या मराठी गाण्यामुळं तिला प्रसिद्धी मिळाली आहे. हे गाणं तुम्ही सुद्धा ऐका आणि कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा !!
