तो काळ म्हणजे १९४८ सालचा फेब्रुवारी किंवा मार्च महिना असावा. नुकताच महात्मा गांधींचा खून झाला होता. लोकभावना गांधींजीच्या हत्येमुळे व्याकुळ झाल्या होत्या. जर गांधीजींवर एखादे गाणे मिळाले तर ते लोकप्रिय होईल. याच विचाराने ते मनमोहन यांना म्हणाले ' मला तुमच्या प्रेमाबिमाच्या कविता नकोत - तुम्ही घरी जा - उद्यापर्यंत मला गांधीजींवर एक कविता लिहून आणून द्या. तुम्हाला साडेसात रुपये हवेत ना? गांधीजींवर कविता द्या, मी तुम्हाला पंधरा रुपये देतो.
मनमोहन यांनी मिनिटभर विचार केला आणि म्हणाले गांधीजीवर कविता लिहायची तर त्यासाठी उद्याची वाट का बघायची, आताच लिहून देतो. गजाननराव वाटव्यांची मुलगी तिथेच अभ्यास करत बसली होती. तिच्याच वहीचा एक कागद घेऊन त्यांनी भराभर लिहायला सुरुवात केली आणि वर उल्लेख केलेली कविता जन्माला आली.
ती पाहा ती पाहा । बापूजींची प्राणज्योती ||
तारकांच्या सुमनमाला । देव त्यांना वाहताती ||
चंदनाचे खोड लाजे । हा झिजे त्याहूनही ||
आज कोटी लोचनीच्या । अश्रुमाला सांगती ||
या कवितेसाठी गायकांनी त्यांच्या हातावर पंधरा रुपये ठेवले. मनमोहन यांची रेशनपाण्याची समस्या संपली होती.
गजाननराव वाटव्यांनी त्या कवितेला सुंदर चाल दिली. या कवितेची रेकॉर्ड रातोरात खपली. वाटव्यांना त्या गाण्याचे १७,००० रुपये मिळाले. कवी मनमोहन मात्र त्यांच्या १५ रुपयांवर खूश होते.