ट्रेन जेव्हा युटेन्हेग स्टेशनमध्ये येईल तेव्हा ती ठराविक शिट्ट्या वाजवत असे. रेल्वेने किती शिट्या वाजवल्या यावरून तीचा रूळ ठरत असे आणि त्याप्रमाणे तो रूळ बदलला जात असे. आता काम एका ठिकाणी बसून करण्यासारखे असले तरी याकामातही चपळता खूप महत्वाची होती. दोन्ही पाय गमावल्यामुळे कधीकधी जेम्सला बसल्या ठिकाणाहून उठून रेल्वे रूळापर्यंत जाण्यासही उशीर लागत असे. घरापासून रेल्वे स्टेशनपर्यंत ये-जा करणेही त्याच्यासाठी खूप मुश्किलीचे काम बनले होते. पण कुणाजवळ काही तक्रार करून उपयोग नव्हता. आपल्या हाताखाली एखादा मदतनीस असेल तर किती बरे होईल या विचाराने तो एखादा मदतनीस मिळतो का हे शोधण्यासाठी आठवडा बाजारात गेला. तिथे त्याला असे दृश्य दिसले जे पाहून तो चक्रावूनच गेला. त्या बाजारात एका मालकाने आपला वानर विकायला आणला होता आणि हा वानर चक्क बैलगाडी चालवत होता. बैलगाडी चालवणारा हा वानर आपल्याला ढकलगाडीतून स्टेशनपर्यंत तरी नेईलच या विचाराने जेम्सने त्याला घरी आणले आणि त्याचे नाव ठेवले जॅक! जॅक आता जेम्सला ढकलगाडीतून स्टेशन पर्यंत ने-आण करू लागला.
जेम्ससोबत राहून राहून जक त्याच्या प्रत्येक कामात त्याला मदत करू लागला. जेम्सने त्याला रेल्वेने दिलेला सिग्नल ओळखून तराफ्याच्या सहाय्याने रेल्वे रूळही बदलायला शिकला. जेम्सची सगळी कामे आता जॅकच करू लागला. युटेन्हेगसारख्या दुरस्थ स्टेशनवर अधिकारी वर्गांची फार वर्दळ नसे. त्यामुळे जॅककडून कामे करून घेताना जेम्सला कुणीही रोखू शकत नव्हते. पण एकेदिवशी रेल्वेतील एक पॅसेंजर खिडकीतून वाकून पाहत होता आणि त्याला जे काही दिसले ते पाहून त्याचे डोळेच पांढरे होण्याची वेळ आली. तो ज्या ट्रेनमध्ये बसला होता त्या ट्रेनने रूळ चेंज करण्याचे सिग्नल दिले आणि एक माकड तराफा घेऊन रूळ बदलू लागला. वानराने तराफ्याने रूळ बदलले आणि ट्रेन पुढच्या प्रवासाला निघून गेली. मात्र त्या प्रवाशाने या गोष्टीवरून रेल्वे अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. एका माकडाला रूळ बदलण्यासारखी अवघड जबाबदारी सोपवून रेल्वे कर्मचारी करतात तरी काय? असा त्याच्या तक्रारीचा सूर होता. त्या तक्रारीची दखल घेऊन रेल्वे अधिकारी युटेन्हेग स्टेशनवर पोहोचले. त्यांनी जेम्सला याबाबत काही प्रश्न विचारण्याऐवजी जॅकचीच परीक्षा घेण्याचे ठरवले.
ज्याप्रमाने रेल्वे रूळ बदलण्यासाठी सिग्नल देते, तसेच सिग्नल त्याला ऐकवण्यात आले. ऐकू आलेल्या शिट्ट्यांच्या संख्येवरून जो काही संदेश दिला जातो तो अचूक समजून घेऊन जॅकने त्यानुसार रूळ बदलले. जॅकने आपले काम निर्धोकपणे पार पाडले होते आणि त्याच्या परीक्षेत तो पास झाला होता.
जॅकच्या कामावर खुश होऊन स्टेशन सुपरीटेंडंट जॉर्ज बी. हाऊ यांनी जॅकला रेल्वे कर्मचारी म्हणून ठेवून घेतलं. त्याला दररोज २० सेंट आणि आठवड्यातून अर्धी बॉटल बिअर असे मानधन निश्चित करण्यात आले. तेव्हापासून शेवटच्या श्वासापर्यंत जॅकने हे काम केले आणि आश्चर्य म्हणजे नऊ वर्षांच्या कार्यकाळात त्याच्या हातून एकदाही चूक झाली नाही. १८९०मध्ये जॅकने या जगाचा निरोप घेतला.
प्राविण्य ही फक्त माणसाचीच मक्तेदारी नाही, प्राण्यांनाही एखाद्या गोष्टीत प्राविण्य मिळवणे जमू शकते हे जॅकने आपल्या जगण्यातून दाखवून दिले.