आज वर्षाच्या पहिल्या दिवशी बोभाटा एक सरप्राईझ पॅकेज’ घाऊन आलंय राव. मंडळी, भाषा ही भाषा असते. तिला कसलंही बंधन नसतं. पण संस्कृत ही अशी भाषा आहे जी सत्यनारायणाच्या पूजेपर्यंतच मर्यादित राहिली आहे. संस्कृत भाषा म्हटलं की आपल्याला मंत्र किंवा श्लोक आठवतात. संस्कृतसारखी समृद्ध भाषा एवढी मर्यादित तर नक्कीच नाही.
तर मुद्दा असा आहे की ‘पंकज झा’ या लय भारी माणसाने संस्कृत भाषेला घेऊन एक मस्त प्रयोग केलाय. आणि सध्या त्याचीच चर्चा आहे. त्याने काय केलंय, पार्टीमध्ये गाजणारे हनी सिंग आणि बादशाहचे रॅप सॉंग्ज चक्क संस्कृतमध्ये भाषांतरित केलेत. फक्त भाषांतरित नाहीत, तर त्याने ते गाऊनही दाखवलेत.
आजपर्यंत तुम्ही अनेक भाषांमधून गाणी ऐकली असतील, अगदी संस्कृतमध्ये भाषांतरित झालेली आणि गायली गेलेली जुनी हिंदी गाणी पण ऐकली असतील... पण संस्कृतमधून पार्टी सॉंग नक्कीच ऐकलं नसेल. पंजक झा हे संस्कृत भाषेत पीएचडी करत आहेत. त्यांना त्यांच्या एका विद्यार्थ्याने आव्हान दिलं की त्यांनी ‘धीरे धीरे से मेरे जिंदगी में आना’ या हनी सिंगच्या गाण्याला संस्कृतमध्ये गाऊन दाखवावं. हे आव्हान त्यांनी स्वीकारलं आणि इथूनच त्यांना नवी कल्पना सुचली. हिंदी ढिंच्याक गाण्याला त्यांनी संस्कृतमध्ये रुपांतरित करण्याचं काम हाती घेतलं आहे. याबद्दल उत्तराखंड सरकारतर्फे त्यांना पुरस्कारही मिळाला आहे. पंकज झा संस्कृतला बघण्याचा दृष्टीकोन बदलण्याचं एक उत्तम काम करत आहेत.
सर्व भारतीय भाषांचं मूळ हे संस्कृत भाषेत आहे हे आपण अनेकदा वाचतो आणि ऐकतो. पण खूप कमी लोक आहेत जे संस्कृत भाषा शिकतात. काळाच्या ओघात अनेक गोष्टी मागे पडतात हे इतिहात सांगतो, पण संस्कृत भाषा लुप्त होणं ही काही तितकी साधी गोष्ट नाही. शेवटी ती सर्व भाषांची जननी आहे !!
