सर्वसामान्यांसाठी रातोरात करोडपती होणे म्हणजे फक्त केबीसी किंवा लॉटरी जिंकल्यावरच शक्य असतं! पण रोजच्या जीवनात काम करताना अचानक असं घबाड लागावं आणि पैशाचा पाऊस पडावा असं झालं तर? एक मासेमारासोबत असे नुकतेच घडले आहे. तुम्ही म्हणाल त्यांना समुद्रात दडलेला खजिना मिळाला असेल! बरोबर ओळखलंत, पण पैसे दागिन्यांचा खजिना नाही.. तर जिवंत खजिना मिळाला. घोळ माशांच्या रुपात! चला वाचूया नक्की घडलंय काय?
पालघर जिल्ह्यातील मुरबेमधील चंद्रकांत तारे असे या मासेमाराचे नाव आहे. २८ ऑगस्टला मासेमारी करताना त्याच्या जाळ्यात अंदाजे १५७ घोळ मासे आले. या माशांचा लिलाव झाला आणि त्यात त्याने तब्बल १.३३ कोटी रुपयांची कमाई केली आहे. सुमारे १२ किलो ते २५ किलो वजनाचे हे घोळ मासे सापडल्याने चंद्रकांत यांच्यासह सगळे मच्छिमार आनंदात आहेत. लिलावात मुंबईच्या १५-२०व्यापारांनी सर्वात जास्त बोली लावली होती.


