२००५ ते २०१० चा काळ म्हणजे ब्ल्यूटूथने गाण्यांची देवाणघेवाण करण्याचा काळ! या काळात सोशल मीडिया आजच्या इतका प्रभावी नव्हता आणि इंटरनेटही स्वस्त आणि सहज-सुलभतेने मिळत नव्हते. म्हणून जे काही डाऊनलोड करायचे ते तोलूनमापूनच असा तो काळ. पण याही काळात काही गाण्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला. यातले एक गाणे म्हणजे 'सोनिये, हिरिये.. तेरी याद आंदी है.'
हे गाणे मार्केटमध्ये आले आणि चांगलेच गाजले. आजकाल जसे पोरं अरिजित सिंगची गाणे ऐकून 'सॅड' होतात, तोच सॅडनेस हे गाणे पोरांना देत होते. अनेकांना हे गाणे आणि तो काळ आठवत असेल. या गाण्याचा हिरो होता शैल. या शैलसोबत मोठा अन्याय झाला हीच भावना अनेकांच्या मनात होती. घरोघरचे प्रेमी या शैलमध्ये स्वतःला शोधत होते.



