कितीही म्हटलं तरी जगात रंग,रुप, राहाणीमान याला महत्त्व देणारे खूप सापडतात. बरं, हे विचार ते फक्त मनात ठेवत नाहीत, तर बरेचदा उघडपणे बोलून दाखवतात, त्यावरून भेदभावही करतातच. या गोष्टीला खतपाणी घालण्यात कुठलीच कसर सिनेमा, नाटक, सिरीयली सोडत नाहीत. इंग्रजीतली अग्ली बेट्टी, हिंदीतली जस्सी आणि मराठीतली 'रंग माझा वेगळा'.. सगळीकडे तीच कथा आहे.
गाणी, सिनेमातले डायलॉग, जाहिराती यावरून गोरेच असायला हवे अन्यथा काय खरे नाही हेच ठसवले जाते. आताच्या रिल्स, इन्स्टाग्राम आणि युट्युब पिढीतील एक सेलेब्रिटी कॅरीमिनाटी एका व्हिडिओत सावळ्या आणि लठ्ठ लोकांना ट्रोल करणे कसे योग्य आहे हे सांगताना दिसला होता आणि त्याला या गोष्टीसाठी समर्थन पण मोठे मिळाले होते.
आज आयडॉल म्हणून ओळखले जातात अशा अनेक लोकांना त्यांच्या रंगावरून हिणवले गेल्याची आणि कामे नाकारली गेल्याची अनेक उदाहरणे आहेत. पण हे लोक खचले नाहीत आणि आपल्या कामातून स्वतःला सिद्ध करत आज यशाच्या शिखरावर पोहोचले आहेत. अशाच काही लोकांची गोष्ट आज आपण वाचणार आहोत.










