आज माणूस मंगळावर, चंद्रावर, जाण्याचा आणि तिथे मानवी अस्तित्व असेल का हे शोधण्याचा प्रयत्न करत आहे. पण माणसाला सगळी पृथ्वी आधी नीट कळली आहे का? पृथ्वीवरच अशा किती तरी जागा असतील जिथे माणूस अजून पोहोचू शकला नाही. आपला प्रदेश, आपला देश सोडून इतर देशात जाण्यासाठी माणूस जेव्हा समुद्रीसफर करू लागला तेव्हा एका एका प्रदेशाचा, देशाचा, खंडाचा शोध लागत गेला. अशाच एका समुद्र सफरीत १७३९ साली एका फ्रेंच कमांडरला एका संपूर्ण दूरस्थ बेटाचा शोध लागला. याला दूरस्थ यासाठी म्हणायचं कारण, या समुद्रातून सहसा कुणी प्रवास करत नाही. अगदी आजच्या काळातही समुद्र प्रवासासाठी या मार्गाचा वापर केला जात नाही. आज आपण अशा दूरस्थ समजल्या जाणाऱ्या बुवे बेटाविषयीची रंजक माहिती जाणून घेणार आहोत.
बुवे, एकदम नवं, कधी न ऐकलेलं आणि विचित्र नाव वाटतं ना? तर वाचकहो, जगात अशी कितीतरी बेटे आहेत जिथे मानवी वस्ती नाही, बुवे बेटही याला अपवाद नाहीच. असे असले तरी बुवे बेटाची एकदम वेगळी खासियत म्हणजे हे बेट चोहोबाजूंनी बर्फाने म्हणजेच हिमनद्यांनी वेढलेले आहे. या बेटाचा संपूर्ण भाग बर्फानेच आच्छादलेला आहे. यातील फक्त ४९ चौरस किमी क्षेत्रफळाची जागा सोडली तर सगळीकडे बर्फच बर्फ आहे. कहर म्हणजे बर्फाने आच्छादलेल्या या बेटावर एक ज्वालामुखीसुद्धा आहे आणि तोही बर्फाने आच्छादलेलाच आहे




