कोरोनामुळे विस्कळीत झालेले सर्वांचे आयुष्य आता कुठे योग्य मार्गावर येऊ लागले आहे. पण गेल्या दोन वर्षांचे प्रतिबिंब पुढे कित्येक वर्ष उमटत राहणार आहेच. दोन वर्ष अनेकांना घरी बसून अभ्यास आणि काम करावे लागले. याचे फायदे आणि तोटे दोन्हीही झाले. 'उठो अनारकली सेमिनार खत्म हो गया है' सारख्या मीम्सना शिक्षक आणि विद्यार्थी दोघांनीही दाद दिली आणि काही लोक त्यातूनही अत्यंत मान लावून शिकले.
या ऑनलाईन शिकण्या-शिकवण्याच्या प्रकरणात सध्या बिहारमधील एक प्राध्यापक मात्र देशभर चर्चेत आले आहेत. मुजफ्फरपूर येथील नितीश्वर कॉलेजला डॉ. ललन कुमार हे प्राध्यापक आहेत. त्यांनी चक्क कोरोना काळात कॉलेज बंद असताना त्यांना मिळालेला पगार परत केला आहे. ही रक्कम तब्बल २३ लाख आहे. जिथे कोणी एक रुपया सोडत नाही तिथे इतका मोठा त्याग केल्यावर चर्चा होणे साहजिक आहे.


