आयुष्य कधी दगा देईल याचा भरोसा नाही. कोरोनाच्या काळात तर आपण याचा खूप जवळून प्रत्यय घेतलेला आहे. पण, काल प्रसिद्ध गायक केके म्हणजेच कृष्णकुमार कुन्नाथ याच्या अकस्मात जाण्याने पुन्हा एकदा या क्षणभंगुरतेची प्रकर्षाने जाणीव झाली. आपल्या आवडत्या गायकाने अवघ्या ५३ व्या वर्षी आयुष्याच्या रंगमंचावरून अशी कायमची एक्झिट घेणे अनेकांच्या पचनी पडलेलं नाही. त्याच्या चाहत्यांसह सबंध बॉलीवूडलाच या घटनेने शोकसागरात लोटले आहे.
हिंदी, तेलगु, मल्याळम, पंजाबी, कन्नड आणि तमिळ अशा वेगवेगळ्या ११ भाषांतून आपल्या गायकीची छाप सोडणारा हा कलाकार असा चटका लावून जाईल अशी कल्पनाही करवत नाही. केकेची गाणी अफाट लोकप्रिय झाली. त्याचा चाहता वर्गही मोठा होता तरीही त्याने स्वतःला बॉलीवूडच्या झगमगाटापासून दूरच ठेवले होते. त्याला प्रसिद्धीचा सोस नव्हता. त्याची गाणी म्हणजे ९० च्या दशकातील तरूणाईच्या भावभावनांचे मूर्तिमंत प्रकटीकरण होते. अनेकांना हा आवाज आणि हे गाणे फक्त आपल्याच साठी आहे असे वाटत राहायचे म्हणूनच केके हे नाव अनेकांच्या हृदयात बंदिस्त झाले होते. आज त्याच्या अचानक जाण्याने त्याच्या चाहत्यांच्या मनातील या भावना ओसंडून वाहत आहेत. केके म्हणजे ९०च्या दशकातील तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनला होता. त्याच्या प्रेमाखातर आम्ही ही आज त्याची अत्यंत गाजलेल्या दहा गाण्याची यादी इथे देत आहोत. ही गाणी तुम्हालाही नक्कीच आवडली असतील.
