कलाकार नेहमीच आपल्या कलेतून जिवंत राहतो. प्रत्यक्ष आयुष्यात चटके सोसूनही मृत्यूपश्चात उदंड प्रसिद्धी, सन्मान आणि आदर मिळालेले अनेक कलाकार होऊन गेले. याच यादीतील एक महत्वाचे नाव म्हणजे व्हिन्सेंट व्हॅन गॉग!
दीडशे वर्षापूर्वी जन्मलेल्या या कलाकाराला कधीच स्वतःची चित्रे फारशी आवडली नाहीत. पण आज मात्र त्याची चित्रे कोटींच्या भावाने विकली जातात. व्हिन्सेंट व्हॅन गॉगचा जन्म ३० मार्च १८५३ रोजी नेदरलँड्स येथे झाला. त्याच्या चित्रावर इम्प्रेशनिस्ट विचारसारणीचा प्रभाव जाणवतो.
त्याची चित्रे जितकी समजण्यास क्लिष्ट होती, तितकेच त्याचे वैयक्तिक आयुष्यही आश्चर्यकारक घटनांनी भरलेले आहे. त्याचे बालपण अतिशय दारिद्र्यात आणि दारूण अवस्थेत गेले. खाणकामगार आणि तत्सम कष्टकरी समाजाचे दु:ख तो आयुष्यभर पाहत आला. त्याच्या चित्रातही याच व्यथा उमटल्या.



