लठ्ठपणा हा बऱ्याच शारीरिक समस्यांचे कारण बनतो. वाढणाऱ्या वजनामुळे अनेकजण त्रस्त असतात. मग सुरू होते डाएटिंग! बरेच जण मग युट्यूब आणि गुगल करून आपापला डाएट ठरवतात. कुणी जीएम डाएट ठरवतं, कुणी दिवेकर तर कुणी दिक्षीत!! काही दिवसांत पुन्हा ये रे माझ्या मागल्या होतो आणि परत परिस्थिती जैसे थे! अशामुळे एक नकारात्मकता येते. पण आज आम्ही कोणताही डाएट सुचवत नाही आहोत, तर या छोट्या छोट्या टिप्स आहेत ज्यामुळे तुमचे वजन नक्कीच कमी व्हायला मदत होईल आणि यामुळे शारीरिक समस्याही बऱ्याच प्रमाणात कमी होतील.
१. तंतूमय पदार्थांचे सेवन:-
तंतूमय पदार्थ म्हणजेच चोथा याला मॉडर्न न्यूट्रिशन मध्ये फायबर म्हटले जाते.
भाज्या, फळे, त्यांच्या कोशिंबिरी यासारखे तंतूमय पदार्थ खाणे आरोग्यासाठी गरजेचे आहे.फळांचा रस न पिता फळे खावीत, डाळी, मोड आलेली कडधान्ये खावीत, दोन्ही जेवणात सॅलड, कोशिंबिरी यापैकी काहीतरी असावे. आहारात तंतूमय पदार्थ वाढवल्याने भरपूर पाणी पिणेही चांगले .
२. साखरेवर नियंत्रण:-
स्थूलपणा कमी करण्यासाठी आणि हेल्दी राहण्यासाठी कमी साखर, कमी तेल, मीठ कमी खाण्याचा सल्ला दिला जातो पण काही लोकाना सतत गोड खाण्याची सवय असते याला शुगर क्रेविंग म्हणतात. अनेकदा आपण हेल्दी म्हणून एखाद ज्युस, कोल्ड्रिंक, एनर्जी ड्रिंक यासारखे पेय घेतो पण त्यामधे साखरेचे प्रमाण जास्त असते. त्यावेळी नारळपाणी, एखाद फळ किंवा घरच्या घरी तयार केलेले एखाद सरबत पिणे केव्हाही चांगलं. साखरे ऐवजी गूळ खाण्याला महत्त्व द्यावे.
३. चालणे हा उत्तम व्यायाम:
चालणे हा एक उत्तम व्यायाम प्रकार आहे. 40 ते 45 मिनिटे चालल्यावर आपल्या जास्तीत जास्त कॅलरीज जळतात. चालण्याबरोबरच दोरी उड्या मारणे, छोटे छोटे व्यायाम प्रकार करणे,योगासने करूनसुद्धा करून आपण आपल्या कॅलरीज कमी करू शकतो.





