गेला महिनाभर बिहारमधल्या मुझफ्फरपूर शहरातले सरकारी श्रीकृष्ण हॉस्पिटल आक्रोशाने भरून गेलेय. चमकी बुखारच्या साथीने १००हून अधिक बालकांचा मृत्यू झाला आहे आणि हे बालमृत्यूचे थैमान थांबण्याचे नाव घेत नाही आहे. AES ॲक्युट इन्सफेलायटीस सिंड्रोम म्हणजे चमकी बुखार या रोगाची साथ पुन्हा एकदा पसरली आहे. पुन्हा एकदा म्हणण्याचं कारण की गेली अनेक वर्षे हा रोग इकडे थैमान घालतो आहे. अचानक येणारा ताप, त्यानंतर आकडी आणि काही तासांतच मृत्यू असे स्वरूप असलेला हा चमकी बुखार म्हणजे मेंदूला सूज येण्याचा आजार आहे.

AES ऍक्युट इन्सफेलायटीस हे या आजाराचे फारच ढोबळ वर्णन आहे. हा आजार फक्त इन्सफेलायटीस नसून तो मेनेनजायटीस, इन्सलोपॅथी किंवा सेरेब्रल मलेरिया असा काहीही असू शकतो. AES हा सर्वसाधारण मेंदूचा कोणताही आजार दर्शवणारा शब्द आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या मेंदूज्वराचा नेमके निदान करणे खूप आवश्यक आहे.
