स्वच्छ भारत अभियानच्या अंतर्गत घरोघरी शौचालयची व्यवस्था आणि घाणीपासून मुक्ततेसाठी प्रयत्न चालू असताना बिहार मधलं एक गाव सध्या चर्चेत आलं आहे. हे गाव काही स्वच्छतेसाठी चर्चेत नाही राव. या गावात एकही बाथरूम नसल्यामुळे ही चर्चा रंगत आहे. काय आहे ना इथली माणसं असं मानतात की बाथरूम बनवल्याने घरात काही तरी अपशकून घडेल, म्हणजेच ‘कुणाची तरी वाट’ लागेल राव !!
हे गाव आहे बिहार मधल्या नवाद जिल्ह्यातले गाजीपूर गाव. या अंधश्रद्धेची सुरुवात झाली १९८४ मध्ये. तेव्हा सिद्धेश्वर सिंह हा तिथला एक रहिवासी आपल्या घरात बाथरूम बनवत होता. त्याच दरम्यान त्याचा मुलगा आजारी पडला. त्याला कोणता आजार झाला आहे हे समजलं नाही, पण काही दिवसातच तो मेला. त्यानंतर गावात चर्चा रंगू लागली की घरात बाथरूम बनवण्याचं काम काढल्यामुळेच हे घडलं असावं. आणि मंडळी ही एकच घटना नाही तर अशीच घटना १९९६ मध्ये पुन्हा एकदा घडली. राम प्रवेश शर्मा नामक एका व्यक्तीच्या घरात बाथरूम बनवण्याचं काम चालू असताना त्याचा मुलगा आजाराने मेला. त्या नंतर मात्र गावातल्या लोकांचा या अंधश्रद्धेवर पूर्ण विश्वास बसला.
२००९ साली कुमार अरविंद नावाच्या एका मुलाने टॉयलेट बनवण्यासाठी गावकऱ्यांना राजी केलं. पण त्याच दरम्यान त्याचा अपघात झाला आणि त्याला जबर दुखापत झाली. २०१५ साली पुन्हा असलीच एक घटना घडली. हे सगळं ऐकताना असं वाटतं की लोकांचा विश्वास वाढवण्यासाठीच या घटना घडत आहेत.
बाहेरच्या गावातली मुलगी इथे सून म्हणून आली तर तिला उघड्यावर शौचाला जावं लागेल या कारणावरून काही दिवसांपूर्वी एका मुलाचं लग्न मोडलं. आश्चर्य म्हणजे इथे पैसा ही समस्याच नाही. गावात टीव्ही आहे, फ्रीज आहे, मोबाईल आहे सगळं आहे... पण बाथरूमचं नाव नका काढू राव१!
नवादाचे जिल्हा दंडाधिकारी मनोज कुमार यांनी या अंधश्रद्धेला मोडण्यासाठी आव्हान स्वीकारायचं ठरवलं आहे. त्यांनी स्वतः गाजीपूर मध्ये जाऊन टॉयलेट बनवण्यासाठी गावकऱ्यांशी बोलण्याचं ठरवलंय आणि सरकारतर्फे टॉयलेट बनवावे लागले तर एकदम २०-२५ टॉयलेट बनवण्याचा त्यांचा निर्धार आहे.
सरकारने स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत याआधी अनेक प्रयत्न केले आहेत, लोन वर पैसे दिले आहेत.. पण लोक टॉयलेट बनवायला तयार नाहीत. लोकांच्या मते ‘जिवंत राहिलो तर संडास करू ना !!’
असं असलं तर कसं होणार भाऊ ?
