भारतात काही गोष्टींना त्यांच्या खऱ्या नावांनी नाही, तर त्या त्या क्षेत्रातील मोठ्या ब्रँड्सने ओळखले जाते. यावरून हे ब्रँड लोकांच्या मनात किती ठसले आहेत याची प्रचिती येते. लोकांना नूडल्स म्हणजे मॅगी वाटते, टूथपेस्ट म्हणजे कोलगेट, खोदकाम मशीन हे जेसीबी, फोटोकॉपी म्हणजे झेरॉक्स... उदाहरणं अनेक आहेत. त्याचप्रमाणे मिनरल वॉटर म्हणजे बिस्लरी हे समीकरणही तितकेच प्रसिद्ध आहे.
आपल्या यशाचा सर्वात मोठा पुरावा हा जेव्हा लोक आपल्याला कॉपी करायला लागतात हा असतो. या बाबतीत पण बिस्लेरीच आघाडीवर आहे. या दोन गोष्टी सिद्ध करतात की बिस्लेरी ही कंपनी किती खोलवर रुजली आहे. मार्केटमध्ये बिस्लेरी कमी आणि बेल्सरी, ब्रिसली अशी अनेक मिनरल वॉटर्स दिसतात. बिस्लेरीचे मार्केट लोकांना माहीत आहे म्हणून नावात थोडा बदल करून बिस्लेरीच्या मार्केटचा थोडा फायदा करून घ्यावे असे लोकांना वाटते.




