आपण लॉकडाऊनच्या चौथ्या टप्यात आहोत. लवकरच लॉकडाऊन शिथिल होण्याची शक्यता आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की कोरोना अजून संपलेला नाही. त्यामुळे आपल्याला बाहेर अत्यंत काळजीने वावरायचं आहे. निदान काही महिने तरी मास्क आणि सॅनिटायझर हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग होणार आहेत. तर, त्यानिमित्ताने आजच्या लेखात आम्ही सांगणार आहोत की कोरोना कसा पसरतो आणि बाहेर गेल्यानंतर काय काळजी घ्यायला हवी.
सुरुवातीलाच हे समजून घेतलं पाहिजे की कोविड-१९ ची लागण होण्यासाठी संसर्गजन्य विषाणूचे किती कण गरजेचे असतात. काही तज्ञांच्या म्हणण्यानुसार संसर्गजन्य विषाणूचे १००० कण गरजेचे असतात. ह्या दाव्याला जगभर मान्यता मिळालेली नाही, तरी त्याला प्रमाण मानून कोणत्या गोष्टींमधून संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक असतो आपण पाहूया.








