लोकप्रिय देवांचा 'पॉप्युलारीटी इंडेक्स' बनवायचा ठरला तर जास्तीतजास्त मतं कृष्णाला मिळाली असती यात शंका नाही. चार शब्द पुढे जाऊन असंही म्हणता येईल की 'योगेश्वर कृष्ण' या प्रतिमेपेक्षा ' बाळकृष्ण' किंवा 'कान्हा' ही प्रतिमा अधिकच लोकप्रिय आहे! उद्या जन्माष्टमीचा सण आहे. सण म्हटला की त्यानुसार खाणंपिणं आलंच. देवाला नैवेद्य म्हणजे आपली खाण्याची चंगळ हे काही वेगळं सांगायला नकोच. उत्तरेत मथुरा पेढे, लोणी, साखर, मखाणे घालून केलेली पंजीरी, टरबूजाच्या बियांची बर्फी असा थाट असतो. तर दक्षिणेत वेगवेगळ्या खिरी म्हणजे पायसमची रेलचेल असते. पण प्रादेशिक समृध्दीनुसार हे नैवेद्याचे प्रकारही बदलत असतात.
कोकणात ज्या दिवशी गोविंदा असतो त्या दिवशी घावने, काळ्या वाटाण्याची उसळ यांच्या जोडीला एक वेगळीच भाजी केली जाते ती म्हणजे शेवग्याच्या पाल्याची भाजी. आता ही भाजी चवीला काही विशेष नसते. इतर पालेभाजीसारखी ही पण भाजीच. थोडी तुरट, कडवटपण असते. तर मग काल्याच्या दिवशी या भाजीचं असं काय महत्व आहे हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयास केला. थेट असं उत्तर कोणाकडेच नव्हतं. पण बोभाटाचे मित्र श्रीयुत पाटणकर यांनी एका लोककथेतून ते रहस्य उलगडून सांगितलं. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.




