दो बूंद जिंदगी के' हे अख्ख्या देशात प्रसिद्ध झालेलं वाक्य. काही वर्षांपासून ही जाहिरात आणि मुख्यतः तिची टॅगलाईन ठरावीक काळात प्रसार माध्यमांवर डोकावत राहते. एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेलच, आम्ही कशाबद्दल बोलत आहोत ते. ही जाहिरात आहे पोलिओ लसीकरणाची.
पोलिओ हा थेट माणसाच्या मज्जासंस्थेवर परिणाम करणारा विषाणूजन्य आजार आहे. त्यामुळेच त्याचा सगळ्यात जास्त दिसून येणारा परिणाम म्हणजे अपंगत्व. ह्या आजारावरची लस ही जोनास साल्क या त्याच्या अमेरिकन संशोधकाच्या नावाने साल्क लस म्हणून ओळखली जाते. साल्क हा अमेरिकन फिजिशियन होता, त्याने १९५५ मध्ये इनऍक्टिव्हेटेड पोलिओ व्हायरस व्हॅक्सिन विकसित केलं. यात मृत विषाणू वापरला गेला होता. त्याआधीही मॉरिस ब्रॉडी, जॉन कोल्मर यांसारख्या शास्त्रज्ञांनी पोलिओ लसनिर्मितीसाठी अयशस्वी प्रयत्न केले होते. ब्रॉडी याने इनऍक्टिव्हेटेड व्हॅक्सिनचा वीस माकडांवर आणि सुमारे ३००० मुलांवर प्रयोगही केला होता! पण हे प्रभावी न ठरल्याने त्याचा वापर थांबवला गेला.



