२०० दशलक्ष वर्षांपूर्वी पृथ्वीची सातही खंडे एकमेकांना जोडलेली होती. ही खंडे जोडून पॅन्जिया नावाचा भूभाग तयार झाला होता. पुढे ही खंडे एकमेकांपासून अलग झाली आणि प्रत्येक खंड स्वतंत्ररित्या विकसित होऊ लागला. त्या खंडांची भौगोलिक स्थिती आणि तेथील हवामान यांनुसार तेथे वनस्पती, प्राणी, आणि सूक्ष्मजीव यांच्या वेगवेगळ्या जाती उदयाला आल्या. खंडे अलग होण्याची ही प्रक्रिया वर्षानुवर्षे सुरू होती.
सुमारे बारा हजार वर्षांपूर्वी अमेरिका इतर खंडांपासून पूर्णपणे वेगळी झाली. परंतु हा प्रदेश जगाला ठाऊक झाला तो युरोपीय दर्यावर्दी ख्रिस्तोफर कोलंबस याच्यामुळे. सन १४९२ मध्ये कोलंबसाने कॅरेबियन बेटांवर पाऊल ठेवले आणि अमेरिकेबद्दल जगाला माहिती झाली. कोलंबसाला धाडसी दर्यावर्दी, अमेरिकेचा शोध लावणारा, युरोपीय संस्कृतीची मुळे अमेरिकेत रुजवणारा असे मानणारा एक वर्ग आहे, तर त्यासाठी त्याने केलेल्या अत्याचारांसाठी त्याच्यावर टीका करणाराही गट आहे. मुळात त्याच्या मोहिमांमागील हेतू व्यापारी होता. त्यासाठी त्याने स्पेनचा राजा फर्डिनांड आणि राणी इसाबेला यांना राजी केले होते. या माणसाने हिस्पॅनिओला बेटांवरील ताईनो रहिवाशांना गुलामीच्या खाईत लोटले आणि त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले. त्याच्या मोहिमा रक्तरंजित आहेत. काहींच्या मते, कोलंबस केवळ बहामा बेटें शोधून काढण्यातच यशस्वी ठरला होता, तोही अपघाताने. पूर्ण अमेरिका खंडाचा शोध त्याने लावलाच नव्हता. त्यामुळे कोलंबसाने अमेरिकेचा शोध लावला हे म्हणणेही पूर्ण खरे नाही.



