कुणाला काही खूप खावंसं वाटत असेल, तर आपण पटकन म्हणतो, "काय, डोहाळे लागलेत का काय"? पण हे डोहाळे का आणि कसे लागतात हे तुम्हांला माहित आहे का? नाही? विचारा तुम्ही, सांगतो आम्ही!!
तर मंडळी, आज आम्ही घेऊन आलोय डोहाळ्यांसंबंधीची माहिती.
आपल्या महान भारतीय संस्कृतीत जन्माला आलेल्या प्रत्येकाने लग्न केलंच पाहिजे आणि लगेच त्याला किंवा बाळ झालंच पाहिजे हा एक अलिखित नियम आहे. ते काही असलं आणि गर्भारपण कितीही अवघड असलं तरी आपल्या पोटात एक जीव वाढतोय ही भावनाच लै भारी असते. पूर्वी लोकांना ढीगाने पोरं व्हायची, पण आता एक नाहीतर फारतर दोन मुलं होत असल्यानं त्या गरोदरपणाचंही जाम कौतुक असतं. एकदा का घरात हे गुपित उघड झालं, की सगळ्यांच्या आनंदाला अगदी उधाण येतं. वडीलधारी मंडळी आपापल्या परीने सुचतील तशा सूचना करतात. “जड वस्तू नकोय उचलायला”, “गरम पडेल असं काही खाऊ नको हो”, “क्काहीही खावंसं वाटलं ना, तर अगदी हक्काने सांग हो”, अशा एक ना अनेक सूचनांचा मारा होतो.






