मुले म्हणजे देवा घरची फुले असे साने गुरुजी म्हणतात. लहान मुले आपल्या निरागस हास्याने सर्वांची मने जिंकून घेतात. त्यांच्यासोबत बोललेले बोबडे बोल आपल्याला आपल्या बालपणात नेतात. आपला सारा शीण त्यांच्या हसण्याने, बोलण्याने बडबडण्याने कुठच्या कुठे पळून जातो. पण, हीच मुले जेव्हा कडकडून चावा घेतात ना तेव्हा अक्षरश: जीव नकोसा होतो. कितीही लाडकं मूल असलं तरी दोन सणसणीत रट्टे ठेवून द्यावेसे वाटतात. ज्यांना नुकतेच दात यायला सुरुवात झालेली असते अशा सहा सात महिन्याच्या मुलांपासून ते साधारण तीन वर्षाच्या मुलापर्यंत ही सवय सर्रास आढळते. कधीकधी यामागची कारणे अतिशय साधी असतात, तर कधीकधी ती चिंता वाढवणारीही असतात. आजच्या या लेखातून आपण याच कारणांचा धांडोळा घेणार आहोत.
सहा महिन्यापासून मुलांचे दात यायला सुरुवात होते. यावेळी त्यांच्या हिरड्या सळसळत असतात त्यामुळे ते हातात येईल त्या वस्तूला चावण्याचा प्रयत्न करतात. म्हणून तर या वयातील मुलांना चोखणी दिली जाते. पूर्वी लाकडाच्या चोखण्या दिल्या जात. आता नॉन-टॉक्झिक रबरपासून बनवलेल्या चोखण्या दिल्या जातात.
लहान मुले आपल्या भोवतालचा परिसर स्पर्श, चव, या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात. एखाद्या खेळण्याला चावले तरी त्याची काही प्रतिक्रिया उमटत नाही, मात्र आई-बाबा किंवा आजूबाजूच्या व्यक्तींना चावल्याने त्यांची प्रतिक्रिया लगेच उमटते. मात्र यातील फरक त्यांना कळत नाही. म्हणूनही ते चावण्याची कृती वारंवार करतात. त्यामुळे कुणाला तरी मुद्दाम इजा करावी म्हणून दुखवावे म्हणून ते मुद्दाम असे वागतात असे अजिबात नसते. त्यांच्या शिकण्याचाच तो एक भाग असतो. चोखणी किंवा रबरची खेळणी किंवा इतर कुठल्याही खेळण्याला चावल्याने त्याला इजा होत नाही, पण व्यक्तींचा चावा घेतल्याने त्यांना काहीतरी होते हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते हा प्रयोग सोडून देतात.



