या पुस्तकाची दुसरी आवृत्ती काढण्यापूर्वीच केळुस्करांनी या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर करण्यासाठी अनुवादक शोधायला सुरुवात केली. मूळचे धारवाडचे प्रा. नीळकंठराव ताकाखाव हे मुंबईला विल्सन कॉलेजात इंग्रजी शिकवत. त्यांनी अनुवादाचे काम स्वीकारले. अनुवादाची प्रुफे तपासणाऱ्या डॉ. मॅकनिकल यांनी इंग्रजी आवृत्तीला प्रस्तावना लिहली. मराठी शिव चरित्राची ही दुसरी आवृत्ती आणि इंग्रजी अनुवादासाठी केळुस्कर गुरुजींना कर्ज काढावे लागले.
शिवरायांचे हे साहित्य विषयक स्मारक पूर्ण करण्यासाठी धडपड्या केळुस्कर गुरुजींनी २०० लोकांची समिती स्थापन केली. चार पाच हजार रुपये फंड जमला. पुस्तकांसाठी सहकार्य करू असा शब्द देणाऱ्या शाहू महाराजांचे दरम्यानच्या काळात निधन झाले होते. मात्र केळुस्कर गुरुजींनी भेट घेतल्यावर इंदूरचे तुकोजीराव होळकर यांनी त्यांना २४००० रुपये दिले. इंग्रजी प्रतीसाठी इतर संस्थानिकांचा प्रतिसाद अत्यल्प होता. दुसऱ्या मराठी आवृत्तीच्या पाच हजार प्रती छापल्या. किंमत मात्र ४ रुपये होती. या शिवचरित्राची गुजराती, तामीळ, कानडी भाषेत भाषांतरे झाली. कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांच्याकडे प्रा. ताकाखाव यांनी कधीही मानधनाची मागणी केली नाही. मात्र केळुस्कर गुरुजींनी सर्व खर्च भागल्यावर उरलेल्या पैशातून १०० तोळे सोने खरेदी केले. इंदूरचे महाराज तुकोजीराव होळकर यांना मुंबईत बोलावून मोठा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमात कृष्णाजी अर्जुन केळुस्कर या मराठी लेखकाने अनुवादक प्रा. नीळकंठराव ताकाखाव यांना तुकोजीराव होळकर महाराजांच्या हस्ते १०० तोळे सोने मानधन म्हणून दिले. या इंग्रजी आवृत्तीच्या ३५०० प्रती परदेशातील ग्रंथालयांना विनामूल्य पाठवल्या.
प्रस्तुत अनुवाद सोबतच्या लिंकवर वाचायला मिळेल
https://archive.org/details/lifeofshivajimah00keluiala/page/n9/mode/2up
आजचा महाराष्ट्र कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांच्यासारख्या शिवरायांच्या कार्याला वाहून घेणार्या -खर्या अर्थाने शिवरायांच्या मावळ्यांची वाट बघतो आहे इतकंच आपण म्हणून या !!!
प्रा.डॉ. संजय थोरात, इस्लामपूर.९८५०२४८२८६