ऑनलाईनच्या या स्क्रीनवेड्या जमान्यात लहान मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी अनेक पालक धडपडत असतात. पण मुलांनीच मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण केली तर? ही नुसती कल्पना नाही. तर एका अवघ्या ११ वर्षांच्या ब्रिटिश-इंडियन मुलाने ही गोष्ट साध्य करून दाखवली आहे. ११ वर्षाच्या स्टॅन्ले सिंग हा मुलगा टीकटॉक आणि युट्यूबच्या माध्यमातून मुलांना वेगवेगळ्या लेखकांची पुस्तके वाचून दाखवत असतो. त्याच्या या वाचनाने जगभरातील मुलांना पुस्तकाकडे आकर्षित केले आहे. त्याच्यामुळे जगभरातील मुलांना नवनव्या पुस्तकांची, लेखकांची माहिती मिळते. आपल्या पुस्तकाचा प्रसार करण्यासाठी सध्या अनेक लेखकही या ११ वर्षांच्या मुलाची मदत घेत आहे.
लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी सोशल माध्यमांचा वापर करत जगाशी जोडून घेण्याचा प्रयत्न केला. स्टॅन्लेलाही जेव्हा काही काळ आपण घरातून बाहेर पडू शकत नाही आणि मित्रांना भेटू शकत नसल्याचे कळले, तेव्हा त्यालाही आता यावर कसा मार्ग काढावा हे सुचत नव्हते. त्याची आई विक्की सिंगने यावर सोशल मिडियाच्या माध्यमातून तो त्याच्या मित्रांशी आणि त्याच्या वयाच्या जगभरातील मुलांशी कनेक्ट राहू शकतो हे शिकवले. आईच्या मार्गदर्शनाखाली स्टॅन्लेने पुस्तक वाचनाचे व्हिडीओ बनवायला सुरुवात केली. सुरुवातीला फक्त त्याला कशात तरी गुंतवून ठेवायचे म्हणून त्याच्या आईने त्याला ही आयडिया दिली. पण स्टॅन्लेच्या वाचनाने अनेक मुलांना वाचनाची प्रेरणा दिली. त्यांना नवनव्या लेखकांची, त्यांच्या पुस्तकांची ओळख करून दिली.


