टोकियो ऑलम्पिक २०२१: सिरीयासारख्या युद्धग्रस्त देशातील ही १२ वर्षांची लहानगी सगळ्याचं लक्ष वेधून घेत आहे...वाचा तिचा प्रवास!!

लिस्टिकल
टोकियो ऑलम्पिक २०२१: सिरीयासारख्या युद्धग्रस्त देशातील ही १२ वर्षांची लहानगी सगळ्याचं लक्ष वेधून घेत आहे...वाचा तिचा प्रवास!!

ऑलिम्पिकमध्ये सामील होणारा खेळाडू तिशीत असला तरी तो नवखा समजला जातो. इथपर्यंत प्रवास करण्यात त्याला काही वर्षे सहज लागत असतात. अशावेळी एखादा १६-१७ व्या वर्षी ऑलिम्पिकमध्ये आला तर आश्चर्य व्यक्त केले जाते. पण सिरीयाकडून यंदा १२ वर्षांची खेळाडू मैदानात उतरली आहे. तिचं नाव हेंड झारा. झेंड सध्या सगळ्या जगाचं लक्ष वेधून घेत आहे.

सिरीया सारख्या अशांत देशाचे एवढ्या कमी वयात प्रतिनिधित्व करणारी ही पोरगी असामान्य असल्याशिवाय इथवर येणे शक्य नाही. टेबल टेनिस खेळणाऱ्या झाराचा प्रवास रोमांचक आहे. तिने जॉर्डन येथे झालेल्या आशिया ऑलिम्पिक पात्रता टुर्नामेंटमध्ये आपल्यापेक्षा तब्बल ३१ वर्ष मोठी असलेल्या मारिया सहाकीनला हरवत ऑलीम्पिकचे तिकीट मिळवले आहे. 

यातही महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती आजवरच्या ऑलिम्पिक इतिहासातील सर्वात कमी वयाची खेळाडू आहे. तर सिरीयाकडून ऑलिम्पिक खेळणारी दुसरी खेळाडू आहे. तिने ५ व्या वर्षी टेबल टेनिस खेळण्यास सुरुवात केली. आजूबाजूला अशांतता आणि सतत सुरू असलेले दहशतवादी हल्ले अशा वातावरणात तिची ट्रेनिंग सुरू होती. ना कुठल्या सोयी ना सुविधा एका हॉलमध्ये खेळत रहायचे हाच तिचा दिनक्रम.

२०१६ ती एका स्पर्धेसाठी कतारला गेली असता, तिची क्षमता आयटीटीएफची अधिकारी इवा जेलरने ओळखली. एवढ्या कमी वयात इतका भन्नाट खेळ बघून त्या प्रभावित झाल्या नसत्या तर नवलच. त्यांनी तिला प्रोत्साहन दिले. एकेक करत झारा राष्ट्रीय स्तरावरील सर्वच स्पर्धा जिंकत गेली.

झाराला आता जगातल्या सर्वोत्तम खेळाडूंशी टक्कर द्यायची आहे. झारा सुवर्णपदक जिंकते की नाही हे पुढे कळेलच, मात्र सिरीया सारख्या भागातून येऊन एवढ्या कमी वयात ही उंची गाठल्यावर त्या आणि तशाच भागातील लोकांना किती मोठी प्रेरणा मिळू शकते, याचा अंदाज मात्र लावता येऊ शकतो.