परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री ‘व्ही. के. सिंह’ आज इराक मधून तब्बल ३८ भारतीयांचे मृतदेह भारतात आणणार आहेत. या मृतदेहांना भारताच्या स्वाधीन करावं म्हणून कायदेशीर प्रक्रिया सुरु होती. खरं तर हे ३८ लोक मरून ४ वर्ष पूर्ण झाली आहेत, पण त्यांना मायदेशी परतण्यासाठी बराच काळ वाट बघावी लागली.
कोण आहेत हे ३८ लोक ?
वर्ष होतं २०१४. मोसुल येथे ४० भारतीय बेपत्ता झाले होते. त्यांचा शोध काही लागला नाही. काहीकाळाने त्यांचे मृतदेह सापडले आणि नवीन धक्कादायक माहिती समोर आली. इस्लामिक स्टेट (ISIS) या दहशतवादी संघटनेने या भारतीयांचं अपहरण केलं होतं. त्यातील १ जण बांगलादेशचा असल्याचं सांगून पळून गेला आणि उरलेल्या ३९ भारतीयांची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती.
कुछ ज़िम्मेदारियों का बोझ काफी ज्यादा होता है। #RestInPeaceMyFellowIndians pic.twitter.com/7cyKDOySvY
— Vijay Kumar Singh (@Gen_VKSingh) April 2, 2018
मंडळी, सुरुवातीला जी बातमी आली त्याप्रामाणे ४० भारतीय बेपत्ता आहेत एवढीच माहिती मिळाली होती. शोध घेतल्यानंतर या ३९ भारतीयांचे शव हाती लागले. या ३९ मधल्या एका मृतदेहाची ओळख अजून पूर्णपणे पटलेली नाही त्यामुळे ३८ मृतदेहांना भारतात आणता येणार आहे. या ३९ लोकांमध्ये २७ लोक पंजाबचे असून ४ हिमाचल प्रदेशचे, २ पश्चिम बंगालचे आणि ६ बिहारचे आहेत.
शेवटी ४ वर्षाने का होईना पण या भारतीयांना मायदेशी परतता येणार आहे.
