आयुष्यातील खास दिवस साजरा करणे हे सर्वांनाच आवडते. त्या दिवशी काही तरी स्पेशल करून तो दिवस कायमचा आठवणीत कोरून ठेवला जातो. रायगड पोलीस दलातील विश्वनाथ पाटील या अधिकाऱ्याने अशीच आगळीवेगळी गोष्ट करून आपला निवृत्तीचा दिवस खऱ्या अर्थाने साजरा केला. विश्वनाथ पाटील वयाच्या ५८ व्या वर्षी निवृत्त झाले. या दिवसाचे निमित्त साधत पाटील यांनी ५८ किलोमीटर धावून एक वेगळाच विक्रम केला आहे. सकाळी ५ वाजता अलिबाग पोलीस मुख्यालयातून सुरु झालेला प्रवास कार्लेखिंड, पोयनाड, वडखळ ते साई मंदिर, पेण आणि तिथून पुन्हा अलिबाग असा झाला. मुसळधार पाऊस, रस्त्यावरची वर्दळ आणि त्यात एक जखमी पाय अश्या सर्व अडथळ्यांना पार करीत पाटील यांनी ५८ किलोमीटर पावणेआठ तासात पार केले.
नवीन पिढीला खेळ आणि फिटनेसचा संदेश देण्यासाठी हा उपक्रम केल्याचं विश्वनाथ पाटील सांगतात. पाटील यांनी या आधी ३२५३ सूर्यनमस्कार आणि ६२०० जोर बैठका मारण्याचा देखील विक्रम केला आहे. पोलीस सेवेत असताना पाटील यांनी जिल्हा पोलीस क्रीडाप्रमुखपद भूषवले होते त्यावेळी त्यांच्या देखरेखीत तयार झालेल्या रायगड पोलीस कबड्डी संघाने अनेक जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धा जिंकून विक्रम केला होता.
पोलिसांच्या फिटनेस विषयी अनेकदा प्रश्न उभे केले जातात पण विश्वनाथ पाटील यांनी निवृत्तीच्या दिवशी ५८ किलोमीटर धावून या सर्व प्रश्नांना खोडून काढले आहे. पाटील यांचा आदर्श ठेवून नवीन पिढी फिटनेस आणि एकंदरीत खेळाकडे वळेल हीच सदिच्छा...
