७७ वर्षांचे आजोबा, ऍक्टिवा, २०,००० किलोमीटर प्रवास आणि ४८ तीर्थक्षेत्रांना भेट!! आणखी कुठे कुठे फिरून आलेत हे आजोबा?

लिस्टिकल
७७ वर्षांचे आजोबा, ऍक्टिवा, २०,००० किलोमीटर प्रवास आणि ४८ तीर्थक्षेत्रांना भेट!! आणखी कुठे कुठे फिरून आलेत हे आजोबा?

तरुणांचे आवडते स्वप्न म्हणजे बुलेट घेऊन निघावे आणि थेट लडाखला जावे. फिरस्ती हा तसा प्रत्येकाचा बकेट लिस्टमधील विषय असतो. आपण तरुण असताना कसे आणि किती फिरलो आहोत हे सांगताना अभिमान वाटतो. तसे पाहता तरुणपणातच फिरण्याची खरी मजा असते. पण पुण्यातील ७७ वर्षीय विश्वास कुलकर्णी यांनी मात्र या समजुतीला जोरदार तडा दिला आहे. जी गोष्ट तरुणांना 'Goals' वाटते अशी गोष्ट त्यांनी ७७ व्या वर्षी करून दाखवली आहे.

विश्वास कुलकर्णी ३ महिन्यांपूर्वी आपली अ‍ॅक्टिवा घेऊन निघाले ते थेट ४८ तीर्थक्षेत्रांना भेटी देत २०,००० किलोमीटरचा प्रवास करूनच परतले. विश्वास कुलकर्णी परत आल्यावर त्यांचे दिमाखात स्वागत झाले आणि ही गोष्ट जगासमोर आली.

त्यांच्या प्रवासाची गोष्ट बोभाटाच्या वाचकांसाठी खास!! 

सोलो ट्रीप म्हणजे एकट्याने प्रवास करणे ऐकायला भारी वाटत असले तरी सोपे नाही. त्यातही कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली होती. वर्षाच्या सुरूवातीला कुलकर्णी यांनी जेव्हा अशा भ्रमंतीवर जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांना त्यांची सून मृणाल यांनी पूर्ण मदत केली. त्यांनी कुलकर्णी यांना संपूर्ण मार्ग आखून दिला, सोबत जीपीएस सिस्टम पण जोडून दिली. 

त्यावेळी ते तामिळनाडू येथे होते. तो काळ असा होता की घरातून बाहेर पडणे देखील धोकेदायक वाटत होते, पण त्यांचा निश्चय पक्का झाला होता. कोविडचे नियम, रस्त्यांची समस्या तसेच इतर अनेक गोष्टींना व्यवस्थित तोंड देत त्यांनी प्रवास पूर्ण केला. कुठलाही प्रवास केल्यावर या प्रवासात आलेले प्रसंग, भेटलेले लोक हा अमूल्य ठेवा असतो. कुलकर्णी यांना आलेले अनुभव देखील असेच सुखद आहेत.

ते सांगतात, लेहला पोहोचल्यावर तेथे एक अब्दुल शेख नावाचा व्यक्ती भेटला. तो त्यांना आपल्या घरी घेऊन गेला आणि पाहुण्यासारखे अगत्य केले. पुढे कश्मीर येथील झोजीला येथे एका बर्फाच्या तलावात ते पडले. तेथून बाहेर निघून श्रीनगर पोहोचण्यासाठी त्यांना लोकांनी मदत केली. श्रीनगर पोहोचल्यावर गाडी रिपेयर करायला ते होंडा शोरूमवर थांबले तर शोरूमवाला त्यांना थेट आपल्या घरी घेऊन गेला. असे माणुसकीचे दर्शन घडवणारे प्रसंग त्यांनी पूर्ण प्रवासात बघितले.

नव्या राज्यात प्रवेश करताना त्यांना कोरोना टेस्ट द्यावी लागत असे. तर लॉकडाऊनमुळे काही मंदिरे बंद होती तर काही मंदिरात त्याना प्रवेश करता आला. कुलकर्णी सांगतात, की त्यांना लहानपणापासून भटकंती करण्याची आवड आहे. लहान असताना सायकल घेऊन ते फिरत असत. नंतर नोकरीच्या काळात पण त्यांनी आपली आवड पुरेपूर जोपासली.

मोठ्या प्रवासावर जाण्याची कुलकर्णी यांची ही काही पहिली वेळ नव्हती. १९९२ साली ते आपल्या पत्नीसोबत देशाच्या किनारी भागांच्या प्रवासावर निघाले होते. त्यावेळी तो प्रवास ८ हजार किलोमीटरचा होता. आपल्या कायनेटिक होंडा गाडीवर मुंबई पासून कन्याकुमारी ते कोलकाता आणि मग पुणे असा प्रवास त्यांनी पूर्ण केला होता. 

आजवर त्यांनी भेटी दिलेल्या ठिकाणांची यादी लांबलचक आहे. ईशान्य भारत, सिक्कीम, कोकण, चार धाम यात्रा एवढेच नाहीतर भूतान आणि नेपाळ इतका प्रचंड प्रवास त्यांनी एम ८०, कायनेटिक होंडा आणि ऍक्टिवावर पूर्ण केला आहे. 

विश्वास कुलकर्णी यांनी एवढ्यात दुसऱ्या ट्रिपचे नियोजन पण करून टाकले आहे. त्यांचा पुढचा प्रवास हा नर्मदा परिक्रमा असणार आहे. ते सांगतात की,  'माझं आरोग्य उत्तम आहे, देशात भेट देण्यासाठी कित्येक चांगली स्थळे आहेत.'

विश्वास कुलकर्णी खऱ्या अर्थाने ज्याला आदर्श आयुष्य म्हणता येईल असे जिवन जगत आहेत. सरधोपट आयुष्य जगण्यापेक्षा कमी साधनांमध्ये देखील आपले छंद पूर्ण करता येतात हेच ते दाखवून देतात. 

मग बोभाटाच्या तरुण वाचकांनो, कधी निघताय रोड ट्रीपवर ??