सतरंगी झाडं ते झाडामध्ये हॉटेल, तुरुंग...जगातली ८ विचित्र झाडे पाहायलाच हवीत !!

लिस्टिकल
सतरंगी झाडं ते झाडामध्ये हॉटेल, तुरुंग...जगातली ८ विचित्र झाडे पाहायलाच हवीत !!

झाडे तर आपण सर्वांनीच पाहिलेली आहेत. काही काही झाडांवर पक्ष्यांचं घरटंही तुम्ही पाहिलं असेल. झाडाच्या खोडात काही पक्षी ढोल बनवून राहतात हेही तुम्ही पहिले असेल, पण तुम्ही कधी झाडत बार, तुरुंग असलेले पहिले आहेत का? नाही ना?  जगात अशीही झाडे आहेत जी एवढी मोठी आहेत की त्यांच्या भल्यामोठ्या आकारामुळे त्यांच्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापर केला जाऊ शकतो. याखेरीज वेगवेगळ्या आकाराची आणि रंगाची देखील झाडे आहेत. आज आपण अशा ८ झाडांबद्दल जाणून घेणार आहोत.

सुरुवात करूया अमेरिकेपासून.

१) वावोना ट्री -

१) वावोना ट्री -

अमेरिकेतील योसोमाईट नॅशनल पार्कमधील वावोना नावाचे हे झाड २२७ फुट उंच होते. या झाडाखाली एक बोगदा खोदण्यात आला होता. १९६९ साली झालेल्या अतिबर्फवृष्टीमुळे हे झाड पडले. आता या झाडामध्ये कित्येक प्राण्यांनी आपले घर वसवले आहे. कीटक तर आहेतच, पण अनेक छोटी-छोटी रोपेही यावर उगवून आली आहेत.

२) सनलँड बोआब ट्री -

२) सनलँड बोआब ट्री -

आफ्रिकेतील लिम्पोपो प्रदेशात एक मोठे जुने झाड आहे. कार्बन-१४ चाचणीवरून हे झाड सुमारे १०६० वर्षे जूने असल्याचे आढळून आले आहे. या झाडाचे खोड खोदून त्यामध्ये एक टुरीस्ट बार तयार करण्यात आल्यानंतर लोकांचं लक्ष वेधलं गेलं. सुमारे ७२ फुट उंच आणि १५४ फुटाचा घेर असलेल्या या झाडामध्ये एकावेळी पन्नास-साठ लोक बसू शकत होते. १९९३ पासून मोठ्याप्रमाणात पर्यटकांनी या झाडाला भेट दिली. २०१७ मध्ये या सनलँड परिसरातील सगळीच झाडे पाडण्यात आली त्यामध्ये हे झाडही होते.

३) ड्रॅगन्स ब्लड ट्री –

३) ड्रॅगन्स ब्लड ट्री –

अरबी द्वीपकल्पाच्या दक्षिणेला असलेल्या येमेन देशात हे झाड आढळते. अगदी पुरातन काळापासून हे झाड याप्रदेशात अस्तित्वात आहे. या प्रदेशातील प्राचीन दंतकथेनुसार एका मेलेल्या ड्रॅगनचे रुपांतर या झाडात झाले असे म्हटले जाते. या झाडातून येणारा रस हा लाल रंगाचा असतो, ज्याला हे लोक ड्रॅगनचे रक्त समजतात, म्हणून याला ड्रगन्स ब्लड ट्री म्हटले जाते. माणसापासून जंगलातील प्राण्यापर्यंत सर्वांसाठी हे झाड उपयुक्त ठरते. मात्र बदलत्या हवामानामुळे या झाडाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

४) ता प्रोह्म ट्री, कंबोडिया –

४) ता प्रोह्म ट्री, कंबोडिया –

कंबोडियातील अंगकोर येथे हे झाड आहे. हे झाड प्रसिद्ध होण्यामागचे कारण म्हणजे हे झाड एका प्राचीन विष्णू मंदिराभोवती उगवले आहे. आज बघताना असे वाटते की या झाडाच्या आतच मंदिर आहे. हे मंदिर तसे प्राचीन आहे. झाडाबद्दल बोलायचं झालं तर या झाडाचं वय ५०० वर्षे असल्याचं म्हटलं जातं. 

५) बोआब ट्री ऑस्ट्रेलिया –

५) बोआब ट्री ऑस्ट्रेलिया –

पश्चिम ऑस्ट्रेलियामध्ये डर्बीपासून ६ किमी दूर अंतरावर हे झाड आढळते. हे झाड सुमारे १५०० वर्षे वयाचे असल्याचे म्हटले जाते. क्रिस्टन हर्मन आणि एलिझाबेथ ग्रँट यांना १९४८ च्या सुमारास या झाडामध्ये तुरुंग वसवण्याची कल्पना सुचली. त्यावेळी व्हेअलीस झोनलीस नावाच्या एका कलाकाराने डर्बी परिसरातील हे भले मोठे झाड शोधून काढले आणि त्याला तुरुंगाचे रूप दिले. काही काळासाठी कैद्यांना या तुरुंगात ठेवले जात असे त्यानंतर दुसऱ्या तुरुंगात त्याची रवानगी होत असे. आज हे झाड पर्यटकांसाठी एक आकर्षणाचे केंद्र बनले आहे. 

६) क्रूक्ड फॉरेस्ट ग्राईफिनो –

६) क्रूक्ड फॉरेस्ट ग्राईफिनो –

पोलंडच्या ग्राईफिनोच्या जंगलात विचित्र आकाराचे सुमारे चारशे पाईन वृक्ष आहेत. ही सगळी झाडे तीन ते पाच फुट उंच वाढल्यानंतर विशिष्ट कोनात वळतात. अशा वळलेल्या झाडांचे जंगल तुम्हाला इतरत्र कुठेही पाहायला मिळणार नाहीत. या जंगलातील सगळीच झाडे अशी का वळतात याचे कोडे मात्र अद्याप सुटलेले नाही. कोणी म्हणते हा गुरुत्वाकर्षणाचा परिणाम आहे तर, कोणी म्हणते यात परग्रहवासीयांचा हात आहे.

७. बॉटल ट्री

७. बॉटल ट्री

हे झाड नामिबियामध्ये आढळते. याचे खोड बाटलीच्या आकाराचे असल्याने याला बॉटल ट्री म्हटले जाते. एखाद्या बाटलीप्रमाणेच वाळवंटातही हे झाड आपल्या आत भरपूर पाणी साठवून ठेवू शकते. थोडेसे उंच वाढल्यानंतरच या झाडाला फांद्या फुटतात. हे झाड पृथ्वीवरील सर्वात विषारी झाडांपैकी एक मानले जाते. आधीच्या काळात याच झाडाचा रस बाणावर लावून आदिवासी लोक शिकार करत असत.

८) इंद्रधनुषी यूकॅलिप्टस –

८) इंद्रधनुषी यूकॅलिप्टस –

हे झाड फिलिपाईन्समध्ये आढळते. फिलिपाईन्स, इंडोनेशिया, पापुआ न्युगिनी सारख्या उष्णकटिबंधीय प्रदेशात हे झाड विशेषत्वाने आढळून येते. या झाडाची साल इंद्रधनुष्यासारखीच दिसते. याच्या खोडावर हिरवा, निळा, नारंगी, लाल आणि जांभळा असे सगळे रंग पाहायला मिळतात. या झाडांच्या खोडापासून विविध प्रकारचे फर्निचर बनवले जाते. चांगल्या वातावरणात ही झाडे २०० फुटांपेक्षाही अधिक उंच वाढतात. 

 

वेगवेगळ्या देशातील वेगवेगळ्या आकाराच्या आणि प्रकाराच्या या झाडाबद्दल वाचल्यानंतर निसर्गासारखा किमयागार दुसरा कुणीच असू शकत नाही, याची खात्री पटते. 

 

लेखिका: मेघश्री श्रेष्ठी

 

आणखी वाचा:

मेघालयात लोक बांधतात जिवंत पूल...!!!