मंडळी, नवरात्रातले नऊ रंग हा महाराष्ट्र टाईम्सचा मार्केटिंग फंडा होता हे तर तुम्हाला माहित आहेच. पण त्याचं काय आहे ना, हौसेला असलं काही कळत नाही, आणि कळलं तरी गंमत म्हणून, तेवढीच चांगल्या साड्यांना हवा लागेल म्हणून, मैत्रिणींच्या सोबत म्हणून किंवा रोजच्या रूटिन आयुष्यातून थोडा बदल म्हणून असं काही ना काही कारणाने नवरात्रात नऊ दिवस नऊ रंगांचे कपडे वापरले जातातच. या नऊ दिवसांसाठी आमच्या बोभाटाच्या स्त्रीवाचकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत खास नऊ रंगांचे नऊ लूक्स!! आणि हो, सण आहे म्हटल्यावर साध्या रोजच्या वापरातल्या साड्या कोण वापरतं? खास ठेवणीतल्याच साड्या बाहेर निघतील ना!!
पण सुरुवात करण्यापूर्वी आम्हांला तुम्हांला एक टिप द्यायची आहे. तर होतं काय की साड्या वर्षानुवर्षे टिकतात. लग्नातला शालू अजूनही तस्साच झळाळी घेऊन असेल पण... तेव्हाच्या तुम्ही आणि आताच्या तुम्ही आकारात बराच फरक पडला असेल. किंवा साडी नवी असेल, पण आजकाल साड्या तितक्याशा नेसल्या जात नाहीत आणि प्रत्येक साडीवर ब्लाऊज शिवणं खर्चिक तर आहेच. म्हणून आम्ही असं सुचवू की साडीतलं ब्लाऊज शिवूच नका. शिवलं तरी त्याचे काठ बिल्कुल वापरु नका. म्हणजे एकच ब्लाऊज एकाहून अधिक साड्यांवर वापरता येईल. कधी मॅचिंग, कधी काँट्रास्ट मॅचिंग करून एकाच साडीत वेगवेगळे लूक्स तुम्हांला दाखवता येतील. अर्थातच काही लूक्स तुम्ही ऑफिसमध्ये ट्राय करु शकता आणि काही त्यादिवशीच्या इतर सांस्कृतिक कार्यक्रमात!






























