मंडळी, भारतीय माणूस जगाच्या कानाकोपऱ्यात पोचलाय. ब्रिटिशांनीही आपल्यावर १५०वर्षं राज्य केलं. साहजिकच भाषेचं संक्रमण झालं आहे आणि अजूनही होत राहिल. इंटरनेट येण्याच्या आधीपासून लोक शब्दकोश म्हणजेच शुद्ध मराठीत डिक्शनरी वापरत आले आहेत आणि डिक्शनरी म्हटलं की पहिल्यांदा आठवते ती ऑक्सफर्ड डिक्शनरी.
तर या ऑक्सफर्ड डिक्शनरीनं याधीही बरेच भारतीय शब्द सामावून घेतले आहेत. म्हणजे चपाती, चटणी, पग, धोती, सरदार, आणा (बाजारातून हे आणा, ते आणावाला आणा नाही, तर चार आणे-आठ आण्यातला आणा) इत्यादी इत्यादी. यावर्षीही ऑक्सफर्ड डिक्शनरीनं तब्बल ७० नवीन शब्दांना सामावून घेतलंय. यापूर्वी ऑक्सफर्ड डिक्शनरीत ९०० भारतीय शब्द होते असं म्हटलं जातंय आणि आता या ७० नवीन शब्दांसोबत तिथल्या भारतीय शब्दांची संख्या १०००पर्यंत गेलीय.
पाहूयात मग कोण आहेत ही नवीन प्रवेश मिळालेली मंडळी आणि त्यांचे अर्थ काय आहेत..
आण्णा- हे म्हणजे आपले मोठे भाऊ. आता वरचा रूपयातला आणा आणि आण्णा याचं स्पेलिंग एकच केलं जातं, म्हणून नवा आण्णा हा Anna2 म्हणून सामावून घेण्यात आलाय.
बडा दिन - ख्रिसमस
बापू- बाबा
बास/बस- पुरे [आपण रिक्षावाल्याला सांगतो ना, "बस्स, थांबा", त्यातलंच हे बास]
भवन
भिंडी
चाचा
चक्का जाम- हा तर आपल्या चांगल्या ओळखीचा आहे ना?
चमचा - हा खायचा नाही बरं, मोठे मोठे लोक आपल्यासोबत बाळगतात, त्यातला चमचा..
चौधरी - उत्तर भारतात हा गावाच्या मुखिया असतो.. सरपंच
चूप - सुमडीत राहायचं.. कळलं ना?
चीची- हे खरं तर मराठीत आपण चुकचुकताना "चक् चक" करतो ना, ते आहे.
दादागिरी - ही काय आपल्याला नवीन आहे का?
देश - मुलूख किंवा त्या व्यक्तीची मातृभूमी
देवी
दिदी
दिया - दिवा
दम - हा माणसाला द्यायचा दम नाही, बिर्याणी किंवा आलूला स्वयंपाक करताना देला जातो तो दम
फंडा- अंडे का फंडा असतो ना, तोच तो..
गोश्त- लाल मांस
गुलाबजामुन- अहाहा..
गल्ली - क्रिकेट खेळायची नाही तर पळून जायची असते तीच ती गल्ली
हाट - बाजारहाटातला हाट
जय - विजय
झुग्गी- चिखल आणि पोलाद किंवा पत्र्याचा वापर करून बनवलेली झोपडी
जी- नावासमोर हे जी लागलं नाहीतर भल्याभल्यांचा पापड मोडतो म्हणे.. फ्लेक्सवर कुठंतरी वाचलंच असेलच्, "शरच्चंद्ररावजीसाहेब.. "
जुगाड - याशिवाय भारतात कुठलं काम होतं का?
खिमा
कुंड
महा- मोठी गोष्ट
मिर्च
मिर्च मसाला
नगर
नमकीन
नाटक
निवास - पार्वती निवास वगैरेमधलं निवास
नाई - नाभिक
किल्ला
सेवक
सेविका
टप्पा -उत्तर भारतात गायली जाणारी छोटी लोकगीतं
टाईमपास - याशिवाय काही होतं का? बघा, आपण भारतीयांनी नवा इंग्रजी शब्द तयार करून त्याला अर्थ पण बहाल केलाय..
उद्योग
वडा- मेदूवडा, बटाटावडा मधला वडा..
पूर्ण यादी पाहिलीत, तर बरेच शब्द अन्नपदार्थांशी निगडित असल्याचं दिसून येईल. यापूर्वीही ऑक्सफर्ड डिक्शनरीत चणा आणि चणा दाल हे शब्द घेतले गेले होते.
