पेपर बॅगच्या जन्माची कथा...पेपर बॅगच्या संशोधिकेला स्वतःच्याच संशोधनासाठी लढा का द्यावा लागला?

लिस्टिकल
पेपर बॅगच्या जन्माची कथा...पेपर बॅगच्या संशोधिकेला स्वतःच्याच संशोधनासाठी लढा का द्यावा लागला?

या महिन्यात १२ जुलै हा जागतिक 'पेपर बॅग डे' होता. पेपर बॅगच्या निर्मितेचे पहिले पेटंट १८५२ मध्ये फ्रान्सिस वोले या संशोधकाला देण्यात आले होते. परंतु आम्ही पोस्ट केलेल्या फोटोत तर एका बाईचा चेहरा आहे! ही महिला कोण आहे?

या बाईंचं नाव आहे मार्गारेट नाइट! फ्लॅट बॉटम पेपर बॅग म्हणजे किराण्याची कागदी थैली - बनवण्याच्या मशीनची संशोधक. फ्रान्सिस वोलेच्या पेपर बॅगचे डिझाइन साधे होते. त्यात आयताकृती तळभाग नव्हता. त्या डिझाइनमध्ये आवश्यक अशी सुधारणा करून नव्या रितीने कागदी थैली बनवण्याच्या मशिनचे डिझाईन मार्गारेटने १८७० साली बनवले. आजही २०२१ मध्ये आपण वापरत असलेली कागदी थैली हे मार्गारेट नाइटचे संशोधन आहे. मार्गारेट ज्या वर्कशॉपमध्ये मशिनचे प्रोटोटाइप म्हणजेच लहान आवृत्ती बनवत होती तिथे उभं राहून चार्ल्स अ‍ॅनान हळूहळू तिची डिझाइन्स चोरत होता. त्यामुळे मार्गारेटला डिझाइन आणि मशीन पेटंटसाठी कडवी झुंज द्यावी लागली. कारण अर्थातच तिच्या मशिनच्या डिझाइनवर चार्ल्स अ‍ॅनानने स्वतःचा हक्क सांगितला होता.

मार्गारेटने हा शोध लावण्यापूर्वी पेपर बॅग या लिफाफ्यासारख्या आकाराच्या असायच्या, त्यांना तळच नसे. त्यामुळे साहजिक खूप वस्तू आत मावायच्या नाहीत, पिशवी कमकुवत आणि अरुंद असल्याने वापरासाठी तितकी सोयीचीही नसे. मार्गारेटच्या मते चौकोनी किंवा आयताकृती तळामुळे या उणीवा भरुन निघतील आणि पिशवी उभीसुद्धा करता येऊ शकेल. हे सगळे मुद्दे लक्षात घेऊन तिने आपोपाप कागद कापणं, घड्या घालणं आणि एकत्र चिकटवून पूर्ण पिशवी तयार करण्याचं यंत्र स्वत:च बनवलं.

चार्ल्स अ‍ॅनानचा मुख्य युक्तिवाद असा होता की एक स्त्री असल्याने मार्गारेट नाइटला मशीनच्या यांत्रिक गुंतागुंती शक्यतो समजूच शकत नाहीत. मार्गारेटच्या वेगवेगळी रेखांकने, अभियांत्रिकी नोट्स, नमुने आणि वैयक्तिक डायरीच्या अभ्यासानंतर आणि इतर साक्षीदारांच्या निवेदनानंतर कोर्टाने तिच्या बाजूने निर्णय दिला. बॅग बनवणार्‍या कंपनीने आणि वर्कशॉपने तिच्या दाव्यांचे समर्थन केले. १८७१ मध्ये ती 'पेपर-बॅग मशीनमधील सुधारणांच्या' पेटंटवर दावा करू शकली आणि आज आपण वापरतो त्या किराणा पिशवीचे युग सुरू झाले.

मार्गारेटला कौतुकाने १९व्या शतकातली सर्वात प्रसिद्ध स्त्री-संशोधक म्हटलं जातं. अमेरिकेत एखादं पेटंट मिळवणारी ती पहिली स्त्री आहे. जेमतेम हायस्कूल शिकलेल्या मार्गारेटने तिनं १००हून अधिक गोष्टींचा शोध लावला असेल, पण स्त्री असल्यानं बऱ्याच गोष्टींचं श्रेय तिला मिळालंच नाही. तिच्या इतर शोधांबद्दल नंतर वाचूच, पण आज दीडशे वर्षांनंतरही उपयोगी पडणाऱ्या तिच्या शोधाबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करुया.