अमूलला कॅनडाच्या कोर्टात जाण्याची वेळ का आली? अमूलच्या ट्रेडमार्क चोरीचं प्रकरण काय आहे?

लिस्टिकल
अमूलला कॅनडाच्या कोर्टात जाण्याची वेळ का आली? अमूलच्या ट्रेडमार्क चोरीचं प्रकरण काय आहे?

एखाद्या मोठ्या कंपनीच्या नावाचा किंवा प्रॉडक्टच्या लोगोचा -ट्रेडमार्कचा वापर करून भुरट्या व्यावसायिकांनी स्वतःचा फायदा करून घेतल्याची उदाहरणे नवीन नाहीत. अनेक नामांकित कंपन्यांच्या व्यवसायाला याची झळ बसते.  अमूलसारख्या मोठ्या कंपनीलाही या समस्येचा सामना करावा लागला आहे.  नुकताच अमूलने पहिल्यांदाच देशाबाहेर ट्रेडमार्क चोरीप्रकरणी खटला जिंकला आहे. काय आहे हे प्रकरण, जाणून घेऊया.

जानेवारी २०२० साली अमूल कॅनडा नावाने कॅनडामध्ये एक नवीन कंपनी सुरु झाली होती. खरंतर अमूलने कॅनडामधल्या कोणालाही कंपनी स्थापन करण्याचे हक्क दिले नव्हते. असं असूनही मोहित राणा, आकाश घोष, चंदू दास आणि पटेल नावाच्या चार व्यक्तींनी अमूल कॅनडा नावाने कंपनी सुरु केली. याखेरीज अमूलच्या ट्रेडमार्कसहित ‘Amul-The Taste of India’ चा वापर करून सोशल मिडियावर खोटी प्रोफाईल तयार केली. लिंकडीन साईटवर “see jobs” आणि “follow” सारखे आयकॉनही देण्यात आले. 

अमूल कंपनीला जेव्हा या गोष्टीची माहिती मिळाली तेव्हा The Kaira District Cooperative Milk Producers Union Limited (अमूल डेअरी) आणि अमूलच्या मार्केटिंगचं काम पाहणाऱ्या the Gujarat Co-operative Milk Marketing Federation (GCMMF) या दोन कंपन्यांनी कॅनडाच्या फेडरल कोर्टात धाव घेतली. अमूल कॅनडा आणि त्याची निर्मिती करणाऱ्या चौघांवर खटला भरण्यात आला.

फेडरल कोर्टाने केलेल्या चौकशीत हे सिद्ध झालं की या चौघांनी अमूलच्या ट्रेडमार्कची चोरी करून ट्रेडमार्क आणि कॉपीराईट कायद्याचं उल्लंघन केलं आहे. खटला जिंकल्यानंतर अमूलला नुकसान भरपाई म्हणून ३२,७३३ कॅनडडियन डॉलर्स म्हणजे जवळजवळ १९.५ लाख रुपये देण्यात आले आहेत. 

तर वाचकहो, अशा प्रकारे पुन्हा एकदा कायद्यासमोर सिद्ध झाले की ‘The Taste of India’ म्हणजे फक्त अमूल अमूल आणि अमूलच आहे.
 

यानिमित्ताने अमूल बेबीच्या जन्माची गोष्ट सांगणारा बोभाटाचा लेख वाचायला विसरू नका.

बोभाटा एक्स्क्लुझिव्ह: 'अमूल बेबी'च्या जाहिरातींमागची कहाणी