महाराजांचं अधिकृत चित्र तयार करणारे कलायोगी जी कांबळे
चित्रकलेचं एक अनोखं विश्व आहे. एका विशिष्ट उच्चभ्रू वर्तुळात चित्रकलेची किंमत ही कोट्यवधींची उड्डाणे घेत असते. बरेच चित्रकार त्यामुळे आर्थिक दृष्ट्या प्रचंड श्रीमंत होतात. अनेक चित्रकार मात्र श्रेष्ठ कलाकार असूनही विस्मृतीचं आयुष्य जगतात. अशाच चित्रकारांपैकी एक म्हणजे चित्रकार जी. कांबळे. कोल्हापूरच्या रांगड्या मातीतून आलेल्या कलायोगी जी कांबळे अर्थात गोपाळ बळवंत कांबळे यांनी आपल्या कुंचल्याने अनेक चित्रपटांचे पोस्टर्स तर सजवलेच, पण त्यांचं महत्वाचं काम म्हणजे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं अधिकृत चित्र त्यांनी तयार केलं. हे चित्र तयार करण्यासाठी त्यांनी तब्बल पाच वर्ष अभ्यास केला. महाराष्ट्र शासनाने हे चित्र महाराजांचं अधिकृत चित्र म्हणून १९७० साली स्वीकृत केलं आहे. या चित्रासाठी महाराष्ट्र शासनाने त्यांना रॉयल्टीही देऊ केली होती. पण या सच्च्या कलावंताने देवाचं चित्र काढण्याचे पैसे घेत नसतात, असं सांगून ही रॉयल्टी विनम्रपणे नाकारली ! छत्रपती शाहू महाराज यांचं एक चित्र जे कलायोगी कांबळे यांनी काढलं आहे ते प्रमाण मानून भारत सरकारने १९७९ मध्ये पोस्ट स्टॅम्प प्रसिद्ध केला आहे.




