'पार्क चुंग-ही' हा दक्षिण कोरियाचा हुकूमशहा! त्याची राजवट अठरा वर्षं चालली. या अठरा वर्षांचा हिशोब मांडायचा, तर त्यात चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टींचा समावेश करावा लागेल. चांगली गोष्ट म्हणजे त्याच्या राजवटीत दक्षिण कोरियाची आर्थिक स्थिती सुधारली. इतकी, की हा देश थेट जगातल्या अत्यंत गतिमान अर्थव्यवस्था असलेल्या देशांच्या पंगतीत जाऊन बसला. मात्र हे सोडलं तर अठरा वर्षांची ही राजवट पार्कच्या हुकूमशाहीमुळेच गाजली.
त्याने अर्थव्यवस्थेला चालना दिली तीच मुळी नागरिकांच्या स्वातंत्र्याचा आणि राजकीय मुक्त वातावरणाचा संकोच करून. त्याच्या म्हणण्यानुसार कम्युनिझमला विरोध करण्यासाठी त्याला ही पावलं उचलावी लागली. पण त्याच्याआड कठोर दमनशाही हेच सत्य होतं. त्याच्या राजवटीत लोकांना वैयक्तिक मत मांडण्याचं स्वातंत्र्य नव्हतं, वृत्तपत्रांवर निर्बंध होते, विरोधी पक्षांना मुस्कटदाबीचा सामना करावा लागत होता, शिवाय न्यायव्यवस्था आणि विद्यापीठं या संस्था पार्कने आपल्या ताब्यात ठेवल्या होत्या. पार्कने त्याकाळच्या कोरियाच्या इंटेलिजन्स एजन्सीचा म्हणजेच केसीआयए या संघटनेचा विस्तार केला होता. तिचा वापर तो राजकीय मुस्कटदाबी करण्यासाठीही करत होता. केसीआयए ही संघटना सुरुवातीपासून इंटेलिजन्स ऍक्टिव्हिटीजमध्ये कार्यरत होती. पार्कला विरोध करणाऱ्या कोणालाही हाताळण्यासाठी या एजन्सीचा वापर व्हायचा. साम-दाम-दंड-भेद नीतिचा वापर करून या संघटनेचे लोक आपली कामं करून घेत. पार्कला जो विरोध करेल त्याला त्याच्या गुन्ह्यानुसार लाच देऊन, अटक करून, किंवा अनन्वित छळ करून 'हाताळलं' जायचं.



