ॲटलास सायकल आठवते? तिच्यावर घोड्यावर बसल्यासारखे ताठ बसायला लागायचे. नंतरच्या काळात कितीही स्टायलिश सायकली चालवल्या असल्या तरी तुम्ही चालवलेली पहिली सायकल कदाचित ॲटलासचीच असेल किंवा फारतर हर्क्युलिसची असेल. ताशी एक दोन रुपये भाड्याने आणलेली, नाहीतर कुणा मोठ्या माणसाची मधूनच पाय टाकून बूड तिरके करुन चालवलेली ॲटलास सायकल!! आज जे कोणी पंचविशी किंवा त्यापुढचे असतील त्यांना ऍटलास सायकल म्हटल्याबरोबर हेच जुने दिवस आठवतील. आजही कित्येकांना सुनील शेट्टीने ऍटलासची केलेली जाहिरात आठवत असेल. मजबुती म्हणजे ॲटलास हे समीकरण रूढ झाले होते. भारतातील मध्यमवर्गाचा कधीकाळी अविभाज्य भाग बनलेली ही सायकल मात्र आता दिसणार नाही. हो, हे खरे आहे. ऍटलास कंपनीने आपली शेवटची फॅक्टरी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
यापुढच्या काळात आपली ही लाडकी ॲटलास इतिहास बनून राहणार आहे. कित्येकांना घरी भांडून, कितीतरी दिवस स्वतः मेहनत करून मग विकत घेतलेली ही सायकल आठवत असेल. या सायकलने एका अख्या पिढीला कित्येक आठवणी दिल्या आहेत. पण आता स्वतः ही सायकल एक आठवण बनून जाणार आहे.



