खात्यातून पैसे गेले तर होणारा मनस्ताप आपण अनुभवला आहे काय? बँकांचे विविध सेवांचे नियम असतात, त्याप्रमाणे पैसे कापले जातात. कधी आपण फसवणूकीला बळी पडतो आणि पैसे हातचे जातात. तेव्हा तर होणाऱ्या मनस्तापाची कल्पनाही करवत नाही. पण विचार करा, याच्या उलट झाले तर? म्हणजे बँकेंनेच आपल्या खात्यावर अचानक दुप्पट पैसे जमा केले तर? बँकेकडून असे कधी झाले तर तुम्ही काय कराल? हा काही शाळेतल्या निबंधाचा विषय नाही, अशी घटना युकेमध्ये खरोखर घडली आहे.
२५ डिसेंबरला युरोपियन बँक सँटेंडरच्या खातेदारांना अचानक धनलाभ झाला आणि तोही बँकेकडूनच! त्या दिवशी २००० व्यावसायिक खात्यांमध्ये तब्बल १७६ मिलियन म्हणजे १३१० कोटी जमा झाले. खातेदार या अनपेक्षित रकमेला बँकेकडून मिळालेले नाताळ गिफ्टच समजू लागले.
युरोपियन बँक सँटेंडरला जेव्हा हे लक्षात आले तेव्हा त्यांनी या गोष्टीचा खुलासा केला. काही तांत्रिक चुकीमुळे हे घडले आहे. बँकेने ही रक्कम ७५००० व्यवहारांतून टाकली. यूकेमधील २००० व्यावसायिक खातेदारांच्या खात्यांवर दोनदा पैसे पाठवले गेले. त्यामुळे काहींना दुप्पट पगार मिळाला. ज्या खात्यांमध्ये जास्तीचे पैसे जमा करण्यात आले, त्यातील काही खाती इतर बँकांचीही आहेत.
बँकेचे म्हणणे आहे की हे व्यवहार वेळापत्रकाच्या म्हणजे scheduling च्या समस्येमुळे असे झाले आहे. आता ही चूक सुधारण्यात आली आहे. डुप्लिकेट झालेल्या व्यवहारांची समस्या सोडवण्यासाठी बँक प्रयत्न करते आहे. बँक खातेदारांशी संपर्क करत आहे.
या घटनेनंतर बरीच चर्चा झाली. तिकडे ते खातेदार काय करतात माहीत नाही, पण विचार करा बँकेची अशी चूक आपल्याकडे घडली तर काय होईल?
शीतल दरंदळे
