पंजाब, भटिंडाच्या रस्त्यावर जर तुम्ही रिव्हर्स गाडी येताना पाहिली तर घाबरू जाऊ नका, गाडी चालवणारा नक्कीच ‘हरप्रीत देव’ असेल. आणि तो इतक्या सफाईने गाडी रिव्हर्स चालवतो की अपघात होणारच नाही. गाडी सरळ चालताना आपण रोजच बघतो पण भाऊ...आज बघूया गाडी रिव्हर्स कशी चालते ते !!
राव, हरप्रीत रिव्हर्स गियरवर कार का चालवतो त्यामागेसुद्धा एक किस्सा आहे. झालं असं की, एकदा हरप्रीतची कार रिव्हर्स गियरमध्ये अडकली आणि ती वेळ होती मध्यरात्रीची. हरप्रीतकडे पैसे नव्हते आणि आजूबाजूला मदत मिळेल असं काही दिसत नव्हतं. मग त्याच्याकडे एकच पर्याय होता, तो म्हणजे गाडी रिव्हर्समध्ये चालवत भटिंडापर्यंत न्यायची. त्याने चक्क हेच केलं. हा मार्ग धोकादायक होता पण यातून हरप्रीतला एक गोष्ट समजली की आपण रिव्हर्समध्ये सफाईदारपणे गाडी चालवू शकतो.

दुसऱ्याचं दिवशी त्याने आपल्या गाडीमागे “रिव्हर्स गियर चॅपियन” लिहिलं. त्यानंतर त्याने मॅकनिकच्या मदतीने गाडीच्या गियर बॉक्समध्ये बदल केले. त्याच्या कारला आता चार रिव्हर्स गियर आहेत. त्याच्या अनेक वर्षांच्या प्रयत्नाने तो रिव्हर्स कार चालवण्यात पटाईत झाला आहे. या अनोख्या कार ड्रायव्हिंगमुळे त्याला एक खास लायसन्सदेखील मिळालं आहे. या लायसन्समुळे तो उत्तर भारतात कुठल्याही ठिकाणी रिव्हर्समध्ये कार चालवू शकतो. आतापर्यंत त्याने तब्बल ६५ हजार किलोमीटर रिव्हर्स कार चालवली आहे आणि तो ८० किलोमीटरच्या वेगाने रिव्हर्स कार चालवू शकतो.
मंडळी, हरप्रीत गेल्या ११ वर्षापासून आपल्या रिव्हर्स ड्रायव्हिंगमुळे माणसांना चकित करत आहे. या ११ वर्षात त्याच्या मानेला अनेकदा इजा झाली. तसेच त्याच्या आरोग्यास धोका निर्माण झाला होता. एवढं होऊनही त्याने हार मानली नाही आणि त्याच्या कामाला यश आलं. वर्ल्ड युनिक रेकॉर्ड तसेच लिम्का वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याचं नाव कोरलेलं गेलंय.

हरप्रीतने याही पुढे जात ‘बॅक गियर ड्राइविंग स्कूल’ सुरु केलं आहे. या स्कूलमार्फत तो इतरांना रिव्हर्स ड्रायव्हिंगचे धडे देतो. त्याच्याप्रमाणे त्याची पत्नीदेखील काही कमी नाही राव. ती रिव्हर्स मध्ये पंजाबी आणि इंग्रजी लिहिण्यात एक्स्पर्ट आहे.
मंडळी या अनोख्या ‘रिव्हर्स’ जोडीला बोभाटाचा सलाम!!!
