आणि तेव्हा १८८८च्या ऑगस्टमध्ये ३९वर्षांच्या आणि पाच मुलांची आई असलेल्या बर्था १९४ किलोमीटर्स म्हणजे १२१ मैलांवर राहणार्या आईला भेटायला भल्या पहाटे निघाल्या. सोबत होती १३ वर्षांचा रिचर्ड आणि १५ वर्षांचा युजीन या त्यांच्या दोन मुलांची. गाडीला पेट्रोलची टाकी नव्हती आणि कार्बोरेटरमध्ये फक्त ४.५ लिटर पेट्रोल राहू शकत असे. बरं, गाडीत पेट्रोलपण थेट वापरता येत नसे, त्यासाठी लिगोरीन नावाचं पेट्रोल थिनर लागे. तेव्हा गाड्याच नव्हत्या तर पेट्रोलपंप काय असणार कप्पाळ?
या प्रवासादरम्यान काय घडलं?
--तेव्हा १८८८ मध्ये पेट्रोल आणि इंधनं औषधांच्या दुकानात मिळत असत. तेव्हा प्रवासादरम्यान बर्थांनी अशी लिगोरीन आणि पेट्रोल विकणारी मेडिकलची दुकानं शोधून काढली. जर्मनीतल्या विश्लॅक्स(Wiesloch) या ठिकाणच्या दुकानात त्यांनी लिगोरीन विकत घेतलं आणि म्हणून या गावाला जगातलं पहिलं इंधन स्थानक म्हणून ओळखलं जातं.
--प्रवासात इंधनाच्या पाईपमध्ये कचरा जमा झाला होता. युरोपियन स्त्रिया हॅट घालत आणि हॅट डोक्यावर राहावी म्हणून पिनच्या साहाय्याने ती केसांत जखडून ठेवत. बर्थांनी या हॅटपिनचा उपयोग करून इंधनाच्या पाईपमधला कचरा साफ केला आणि त्यांच्या गार्टर बेल्ट(स्त्रियांच्या अंतर्वस्त्रांना असलेला बेल्टचा प्रकार)चा इन्सुलेटर म्हणून उपयोग केला.
--त्यांच्या गाडीचे लाकडी ब्रेक्स चालेनात म्हणून एका चप्पल दुरूस्त करणार्याकडे जाऊन तिथं त्यांनी चामड्याचे ब्रेक पॅड्स बनवून घेतले. हे जगातले पहिले ब्रेक पॅड्स म्हणून प्रसिद्ध झाले.
--आता आपल्याकडे रेडिएटरमध्ये कूलंट टाकतात, पण तेव्हा गाडीचं इंजिन खूप गरम होऊ नये म्हणून पाणी टाकावं लागायचं. या प्रवासात सारखं पाणी टाकावं लागण्याचा चांगलाच त्रास बर्था बेन्झना झाला.
--या कारला दोनच गिअर्स होते. त्यामुळं गाडी चढावर चढू शकली नाही. बिचार्या युजीन आणि रिचर्डना चढावर गाडी ढकलत न्यावी लागली.
--प्रवासादरम्यानच्या गावातले लोक या घोड्याविना चालणार्या गाडीला घाबरले. त्यांना हे सैतानाचं काम वाटलं. पण यामुळं बर्थांना आणि बेन्झच्या गाडीला खूप प्रसिद्धीही मिळाली.
--जाताना वाटेत लागलेल्या चढ्या डोंगररांगांना बर्था घाबरल्या होत्या त्यामुळं परत येताना बर्थां दुसर्या मार्गाने परतल्या.