१९७१ सालचं भारत-पाक युद्ध सुरु होतं. पाकिस्तानी सॅबर जेट्सच्या तुकडीने कच्छमधल्या भूज हवाईपट्टीवर (airstrip) १४ दिवसांत तब्बल ९२ बॉम्ब्सचा मारा केला होता. पूर्ण हवाईपट्टी उध्वस्त झाली होती. पण हवाईपट्टी असणं अत्यावश्यक होतं. युद्धात या भूजच्या हवाईपट्टीचं अत्यंत महत्त्व होतं. भारतीय इतिहासातलं पर्ल हार्बर म्हणता येईल इतका हा असा हा एक अत्यंत महत्त्वाचा क्षण होता. या कठीण काळात मोजक्या भारतीय सैनिकांनी एक पाऊलही मागे न जाता स्थानिक ३०० सामान्य महिलांच्या मदतीने ३ दिवसांत भूजची हवाईपट्टी पुन्हा कशी उभारली आणि युद्धात भारताची जिद्द आणि ताकद कशी दाखवून दिली हे आजही आपल्या सर्व भारतीयांना प्रेरणा देणारं आहे. त्याचीच ही गोष्ट.
९२ बॉम्बनी हवाईपट्टी उध्वस्त केली पण सैनिक व ३०० सामान्य स्त्रियांनी फक्त ३ दिवसांत ती पुन्हा उभारली!!


(१९७१चं भारत-पाक युद्ध)
तारीख ८ डिसेंबर १९७१. संपूर्ण हवाईपट्टी उध्वस्त झाल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता भारतीय हवाई दलाचे जवान हवाईपट्टीच्या दुरुस्तीच्या कामाला लागले, पण वेळ फारच कमी होता आणि मनुष्यबळ अपुरं पडत होतं. पुढच्या ३ दिवसांमध्ये हवाईपट्टी दुरुस्त होणं अत्यंत गरजेचं होतं. इथपर्यंत ही कथा आल्यानंतर आता या कथेच्या नायकाची ओळख करून द्यायला हरकत नाही. या कथेचा नायक म्हणजे विजय कर्णिक. भूज एअरबेसच्या ताफ्याची धुरा त्यांच्या हातात होती. त्यावेळी भूज एअरबेसवर त्यांच्यासोबतीला २ वरिष्ठ अधिकारी, वायुदलाचे ५० अधिकारी आणि सुरक्षा दलाचे ६० अधिकारी होते. मनुष्यबळ अपुरं पडल्यास हवाई पट्टी ठरलेल्या वेळेत पूर्ण होणार नाही हे विजय कर्णिक यांनी ओळखलं. अधिक मनुष्यबळासाठी त्यांनी जवळच्याच माधापुर येथील स्थानिक महिलांकडे विनंती केली. त्यावेळचे जिल्हाधिकारी यांनी स्वतः पुढाकार घेऊन महिलांना आवाहन केलं. गावाच्या सरपंचांनी देखील आपणहून पुढाकार घेऊन ३०० महिलांचा गट उभा केला.

विजय कर्णिक यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं, "जर त्यांच्यापैकी कोणत्याही महिलेचा जीव गेला असता तर ते मोठं अपयश ठरलं असतं." पण दुसरा मार्गच नसल्यामुळे विजय कर्णिक यांनी निर्णय घेतला आणि त्या निर्णयामुळे इतिहास रचला गेला. विजय कर्णिक यांनी त्या ३०० महिलांना सर्व बाबी समजावून सांगितल्या. बॉम्बिंग झालीच तर जीव कसा वाचवायचा याबद्दल सर्व सूचना दिल्या. कौतुकास्पद बाब म्हणजे बॉम्बिंगची पूर्ण माहिती मिळूनही एकाही महिलेच्या चेहऱ्यावर भीती नव्हती. या महिला आपलं घर सोडून देशासाठी काम करण्यास तिथे आल्या होत्या. त्या ३०० पैकी एका बाईचं नाव वलबाई होतं. त्यांनी आपल्या आठवणी सांगताना म्हटलं होतं, "मी माझ्या १८ माहिन्यांच्या मुलाला शेजाऱ्यांच्या भरवश्यावर सोडून आले होते. जेव्हा शेजाऱ्यांनी विचारलं की जर तुला काही झालं तर तुझ्या मुलाचा सांभाळ कोण करणार, तेव्हा माझ्याकडे उत्तर नव्हतं".

अशी ही खरोखरच महिला शक्ती युद्धात उतरली होती. कामाच्या पहिल्याच दिवशी अधिकारी आणि महिलांना पूर्ण दिवस उपाशी राहावं लागलं. दुसऱ्या दिवशी जवळच्याच मंदिरांमधून मिठाई आणि फळे वाटण्यात आली. या आधारावर सर्वांनी दुसरा आणि तिसरा दिवस काढला. या दरम्यानचं काम अत्यंत हलाखीचं आनि परिश्रमाचं होतं. पोटात अन्न तर नव्हतंच, पण एअर स्ट्राईक होऊन कधीही जीव जाण्याचा धोका होता. अशा अटीतटीच्या क्षणी सर्वांनी जवळच्याच बंकरमध्ये आसरा घेतला. हवाईपट्टी शत्रूच्या नजरेच पडू नये म्हणून त्यावर शेण थापण्यात आलं.

चौथ्या दिवशी म्हणजे ११ डिसेंबर १९७१ रोजी हवाई पट्टी तयार झाली आणि पहिल्या विमानाने हवेत झेप घेतली. सर्वांच्याच मेहनतीचं सोनं झालं होतं. पुढे युद्ध समाप्तीनंतर ३ वर्षांनी त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या महिलांना बक्षीस देऊ केलं तेव्हा सर्वांनी ते बक्षीस नाकारलं. "आम्ही जे केलं ते देशासाठी केलं" हा त्यांचा ठाम विचार होता. सरकारकडून मिळालेल्या ५०,००० रुपयांतून माधापूर येथे समाज मंदिराची स्थापना करण्यात आली. गावात या ३०० वीरांगनांना समर्पित ‘वीरांगना स्मारक’ उभारण्यात आलं आहे.

वाचकहो, हवाई पट्टी तयार झाल्यानंतर जेव्हा महिला घरी जात होत्या तेव्हा त्यांनी जाताजाता म्हटलं की जर आवश्यकता असेल तर आम्ही देशासाठी पुन्हा हजर होऊ, आमच्यात आजूनही तीच उर्जा शिल्लक आहे. याच उर्जेच्या जोरावर आपण १९७१ चं युद्ध जिंकलं. विजय कर्णिक, त्यांचे सोबती आणि त्या ३०० वीरांगनांना बोभाटाचा सलाम.
आणखी वाचा :
कोण आहेत हे विजय कर्णिक ज्यांच्यावर सिनेमा बनतोय...वाचा या अज्ञात हिरोची शौर्यगाथा !!