शनिवार स्पेशल : बोभाटाने घडवलेला यशस्वी मराठी उद्योजक - ब्रँँड मॅॅन 'कृष्णा नांदे'

लिस्टिकल
शनिवार स्पेशल : बोभाटाने घडवलेला यशस्वी मराठी उद्योजक - ब्रँँड मॅॅन 'कृष्णा नांदे'

गेल्या वर्षी बोभाटाने "मराठी पाऊल पडू दे पुढे" ही व्यवसाय मार्गदर्शक लेखामाला लिहिलेली तुम्हाला आठवत असेलच !! या मालिकेत चाकोरीबाहेर जाऊन करण्यासारख्या काही व्यवसायाविषयी आम्ही मार्गदर्शन केले होते.

गेल्या आठवड्यात आमच्या ऑफीसला एका अनोळखी वाचकाचा फोन आला. फोन करणार्‍या व्यक्तीने त्यांचा परिचय "मी तुमचा वाचक, कृष्णा नांदे बोलतोय "असा करून दिला. साहजिकच आम्ही त्यांना फोन करण्याचे काय विशेष प्रयोजन असे विचारल्यावर त्यांनी जी कहाणी सांगितली ती केवळ थक्क करणारी नव्हे, तर आमच्यासाठीपण प्रेरणादायी होती. आजच्या शनिवार स्पेशलमध्ये वाचा बोभाटाच्या माध्यामातून प्रेरणा घेऊन यशस्वी झालेल्या एका व्यावसायिकाची गोष्ट!!

कृष्णा नांदे मूळचे लातूरचे रहिवासी आहेत. मराठवाड्यातले अनेक तरुण मुंबई ठाणे परिसरात नोकरीधंद्यासाठी येतात तसे ते ठाण्यात आले होते. दोन वेळची चिंता मिटवणारी नोकरी त्यांच्या हातात होती.  पण त्याहून पुढे जाऊन काहीतरी मोठे काम करावे अशी त्यांची इच्छा होती. याच दरम्यान बोभाटावर त्यांनी स्टॉकलॉट या विषयावर लेख वाचला. त्याच दिवशी त्यांनी लेखात उल्लेख केलेल्या व्यापार्‍याला फोन केला. भेटीचा दिवस ठरवून रेडीमेड गारमेंटचा पहिला लॉट विकत घेतला. या लॉटची विक्री झाल्यावर त्यांचा उत्साह वाढला आणि विक्री जोरात सुरु केली. थोड्याच दिवसांत या क्षेत्रातील अनेक व्यापारी त्यांच्या संपर्कात आले. आता त्यांनी खरेदी थेट कंपन्यांकडून करण्यास सुरुवात केली. या कामाचा वेग इतका वाढला की पुढच्या काही दिवसात त्यांनी गोव्यात त्यांचे दुकान सुरु केले.

गोवा पर्यटकांची पंढरीच आहे, त्यामुळे विक्री जोरात सुरु झाली. आता त्यांची घोडदौड जोरात सुरु आहे . सुरुवात जेंट्स स्पेशलपासून करून आता लेडीज गार्मेंटची विक्री पण त्यांनी सुरु केली. नुकताच त्यांनी किड्स सेक्शन पण सुरु केलाय. दुकानाच्या माध्यमातून व्यवसाय सुरु झाल्यावर या क्षेत्रात त्यांचे नाव झाले आणि कृष्णा नांदे आता भारतातल्या कानाकोपर्‍यात , काश्मिर -आसाम सारख्या दूरदूरच्या राज्यात देखील माल पाठवतात. सध्या ही सेवा ठोक विक्रेत्यांसाठी (होलसेल) असली तरी लवकरच किरकोळ विक्रीचे मध्यम श्री. कृष्णा नांदे लवकरच सुरु करत आहेत.

त्यांच्या फेसबुक पेजला जाऊन अधिक माहिती तुम्हाला मिळेलच. सोबत त्यांचा फोन नंबरपण आम्ही देत आहोत. व्यवसाय करू इच्छिणार्‍या बोभाटाच्या वाचकांना त्यांना थेट संपर्क करता येईल.