आमच्या बोभाटाच्या बागेत आम्ही काही दिवसातच कवी लोकांना येण्याची बंदीच करणार आहोत. आता तुम्ही नक्की विचाराल की या कवींनी काय घोडं मारलं आहे? तर त्याचं असं आहे की ही कवी मंडळी दिवसरात्र रोमँटीक कल्पनांचे चष्मे लावून फिरत असतात आणि साधा सृष्टीतला 'लेन-देन'चा व्यवहारही त्यांना अमरप्रेमासारखा दिसत असतो.
आता बघा, बागेत फुलपाखरं असतात आणि पतंग ही असतात. दिवसा हे लोक फुलपाखरांवर कविता करतात आणि रात्री पतंगांवर! त्यांचा प्रेमाचा आवडता सिध्दांत म्हणजे जीवाची तमा न बाळगता ज्योतीवर झेपावणारा पतंग! त्याला ते सच्च्या प्रेमाचं प्रतिक मानतात. या प्रेमप्रकरणातलं सत्य असं आहे की पतंग हे 'नॉक्टर्नल' म्हणजे रात्री फिरणारे जीव असतात. त्यांना ज्योतीचा प्रकाश दिसतो आणि ते तिकडे झेपावतात. बस्स! इतकंच. प्यार वगैरे काही नाही. पण हिंदी आणि उर्दूत 'शमा-परवाना'च्या अफेअरवर शेकडो शेर लिहिले गेलेत.


